MumbaiNewsUpdate : एनसीबीला “क्रूझ”वरील पार्टीची टीप दिली कुणी ? ” या ” व्यक्तीने स्वतःच केला गौप्य्स्फोट

मुंबई: एनसीबीला क्रूझवरील सुरक्षा रक्षकाकडून या जहाजावरील रेव्ह पार्टीची सूचना मिळाली आणि अतिशय नियोजन पद्धतीने क्रूझवर छापा टाकून या पार्टीचा पर्दापाश केला असे सांगितले जात असताना , आपण स्वतःच याविषयीची गोपनीय माहिती एनसीबीला दिली अशी माहिती वादाच्या भोवऱ्यात सापडलेलय मनीष भानुशाली याने स्वतःच दिली असून मी भाजपचा पदाधिकारी नसून कार्यकर्ता असल्याची कबुली दिली आहे. पोलिसांच्या सांगण्यावरूनच आपण त्यांच्या समवेत होतो असेही त्याने म्हटले आहे.
दरम्यान क्रूझवरील पार्टीवर छापा टाकला तेव्हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीममध्ये खासगी व्यक्तींचाही समावेश होता, असा गंभीर आरोप मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता, हे आरोप लगेचच एनसीबीने फेटाळले होते. आता ज्या खासगी व्यक्तींची नावे घेतली गेली आहेत त्यापैकी मनीष भानुशाली हा समोर आला असून त्याने आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. मलिक यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.
मनीष भानुशाली याने क्रूझवरील कारवाईवेळी आपण एनसीबीच्या टीमसोबत होतो हे मान्य केले आहे. मात्र, त्याची पार्श्वभूमी सांगताना नवाब मलिक यांचे आरोप त्याने फेटाळले आहेत. भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असल्याचे मलिक म्हणाले होते. मात्र मी भाजपचा सामान्य कार्यकर्ता असून माझ्याकडे कोणतेही पद नसल्याचे भानुशाली याने स्पष्ट केले. क्रूझवरील पार्टीबाबतही भानुशाली याने महत्त्वाचे दावे केले.
मी स्वतःच हि माहिती एनसीबीला दिली
भानुशाली म्हणाला कि , मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती मला मिळाली होती. ही बाब गंभीर असल्याचे माझ्या लक्षात आले व एक सजग नागरिक म्हणून मी याबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. १ ऑक्टोबर रोजी याबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मी सांगितले. त्यावर २ ऑक्टोबर रोजी मला त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात भेटायला बोलावले. त्यानुसार मी तिथे जाऊन माझ्याकडचा सर्व तपशील त्यांना दिला. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे त्यावेळी तिथे उपस्थित नव्हते. काही वेळाने ते आले तेव्हा त्यांनाही सदर अधिकाऱ्याने ही माहिती दिली, असे भानुशाली याचे म्हणणे आहे.
त्याच्या म्हणण्यानुसार क्रूझवर बोर्डिंगची वेळ १२ वाजताची होती. त्यामुळे एनसीबीची टीम लगेचच निघाली. मी माहिती दिलेली असल्याने त्यांनी मलाही सोबत येण्यास सांगितले. त्यानुसार मी त्यांच्यासोबत गेलो. तिथून पररतानाही मी त्यांच्यासोबत होतो. तपासाचा भाग म्हणून त्यांनी मला सोबत ठेवले होते, असेही भानुशाली याने नमूद केले. खरे तर ड्रग्ज पार्टीबाबत माहिती देऊन मी देशसेवेचे काम केले आहे. ड्रग्जचं रॅकेट पकडले जावे म्हणून ही माझी तळमळ होती. असे असताना मंत्री नवाब मलिक हे मला दोषी म्हणत असतील तर ते योग्य नाही. मी यासाठी त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा करणार आहे . मी दिलेल्या माहितीनंतर ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. आता मलिक यांनी माझे नाव समोर आणल्याने ड्रग्ज माफियांकडून माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यासाठी मी महाराष्ट्र सरकारकडे संरक्षणाची मागणी करणार असल्याचेही भानुशाली म्हणाला.