MaharashtraNewsUpdate : अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ , आयकर विभागाकडून सुरु आहे झाड झडती

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासह त्यांच्या इतर मालमत्तांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या असल्याचे वृत्त आहे. सध्या नागपुरातील मिडास बिल्डिंगमधील साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयाची सीआरपीएफच्या बंदोबस्तात झाडाझडती सुरू आहे. शुक्रवारपासून देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आणि त्यासोबतच त्यांच्या इतरही मालमत्तांवर आयकर विभागाकडून हि कारवाई सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आयकर विभागाकडून तब्बल १६ तास झाडाझाडती करण्यात आली. गेल्या काही दिवसांत अनिल देशमुख यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. या आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली. शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरातून निघाले. यावेळी अनिल देशमुख यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे आणि फाईल्स आपल्यासोबत नेल्याची माहिती समोर येत आहे. असे सांगण्यात येत आहे कि , अनिल देशमुख यांच्या घरी शुक्रवारी ज्यावेळी आयकर विभागाने धाड टाकली त्यावेळी त्यांच्या घरी अनिल देशमुख आणि त्यांची दोन्ही मुले उपस्थित नव्हते. तर अनिल देशमुख यांच्या पत्नी आणि सून घरी होत्या.
या आधी काय कारवाई झाली ?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ईडीकडून आणि आता सीबीआय, आयकर विभागाकडून या कारवाया सुरु आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी मननी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने २५ मार्च रोजी सीबीआयने पहिल्यांदा अनिल देशमुखांच्या नागपूर येथील घरी छापा टाकला. तर २४ एप्रिल रोजी ईडीने पहिल्यांदा अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी छापेमारी केली केली. त्यांनतर १६ मे, २६ मे, १६ जुलै आणि ६ ऑगस्टला परत ईडीने कारवाई केली होती. आणि पुन्हा १७ सप्टेंबरपासून आयकर विभागाने छापेमारी सुरु केली आहे.
दरम्यान अनिल देशमुख यांच्याकडून बचावासाठी न्यायालयात प्रयत्न केले जात असताना ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी जवळपास पाच वेळा समन्स सुद्धा बजावले आहे. मात्र, अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी अद्याप हजर राहिलेले नाहीत. त्यातच आता आयकर विभागाच्या छापेमारीमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे.
दोन महिन्यांपूर्वी अनिल देशमुख यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने केलेल्या कारवाईत त्यांची तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. याशिवाय ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ताही जप्त केली असून या स्थावर मालमत्तेची किंमत ४.२० कोटी रुपये इतकी आहे.