CoronaMaharashtraUpdate : राज्याची आजची कोरोनाची ताजी स्थिती अशी आहे …

मुंबई: राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात २ हजार ७४० रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार ६२३ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार २३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या २ हजार ९७२ इतकी होती. तर, आज २७ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ४६ इतकी होती.
या आकडेवारीवरून राज्यात कालच्या तुलनेत आज करोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्या घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. शिवाय मृत्यूची संख्याही घसरली असून कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील थोडी कमी असल्याने आजची स्थिती तुलनेने दिलासादायक आहे. दरम्यान आज राज्यात झालेल्या २७ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ०९ हजार ०२१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के इतके झाले आहे.
राज्यातील सक्रिय रुग्णाच्या संख्येत घट
दरम्यान आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४९ हजार ८८० इतकी असून काल ही संख्या ५० हजार ४०० इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १३ हजार १०२ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या किंचित घटून ती ७ हजार ८५८ वर आली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ४ हजार ९१९ वर खाली आली आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ६ हजार ६२५ अशी आहे. तर, सांगलीत एकूण १ हजार ८२६ अशी वाढली आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ६९६ इतकी आहे.
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार ०३३ इतकी आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ०९८ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ७२९, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९६९ इतकी आहे. याशिवाय धुळे, वाशिम, भंडारा जिल्ह्यात केवळ एक सक्रिय रुग्ण असून औरंगाबादमध्ये हि संख्या ६१०, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १०४ इतकी वाढली आहे. अमरावतीत ही संख्या ९७ वर आली आहे. तर धुळे, वाशिम आणि भंडारा जिल्ह्यात फक्त एक सक्रिय रुग्ण आहे.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६० लाख ८८ हजार ११४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ८७७ (११.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९९ हजार १९२ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत. तर, १ हजार ८८३ व्यक्ती संस्थात्मकविलगीकरणात आहेत.