AurangabadCrimeUpdate : मुंबईतील भामट्याचा वृध्दाला ३. ८५ लाखांना गंडा

औरंगाबाद : भाडेकरुने वृध्द घरमालकाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याचे आमिष दाखवून पावणेचार लाखांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. मनोज चंद्रकांत फडके (रा. अच्युतानंद अपार्टमेंट, एस. बी. रोड, दहीसर, मुंबई) असे भामट्याचे नाव आहे. न्यायालयाच्या आदेशाने सातारा पोलीस ठाण्यात फडकेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश नानुलाल मिश्रा (६०, रा. लक्ष्मी रेसीडेन्सी, आलोकनगर, सातारा परिसर) यांच्या घरात मनोज फडके हा किरायाने राहत होता. त्याने १ जून २०१९ ते २० जुलै २०२० या काळात रमेश यांना आॅनलाईनबाबत कोणतेही आकलन नव्हते. त्यामुळे रमेश हे आॅनलाईनव्दारे वस्तू मागविण्यासाठी फडकेची मदत घ्यायचे. तेव्हा तो रमेश यांच्या मोबाइलवरुन माहिती भरुन द्यायचा. त्यासाठी पासवर्ड आणि ओटीपीचा उपयोग करायचा.
फडके शेअर्सचा व्यवसाय करत असल्यामुळे त्याला बाजारपेठेत गुंतवणूक करण्याचे आणि शेअर्स विक्री करण्याचा ब-यापैकी अनुभव होता. त्याने रमेश यांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळू शकतो असे आमिष दाखवले. तो नेहमी शेअर मार्केटींग कसे करावे याबाबत माहिती देत होता. त्याने शेअर मार्केटींग शिकवित रमेश यांना बँकेत डी मॅट खाते उघडण्यास सांगितले. त्याप्रमाणे रमेश यांनी बँकेत खाते उघडले. त्यांच्या खात्यावर सन २०१९ मधील जून, जुलै आणि आॅगस्ट या तीन महिन्यात खात्यावर प्रायोगिक तत्त्वावर व्यवहार करण्यात आला. मात्र, शेअर मार्केटमधून रमेश यांना कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे त्यांनी या खात्यावरील व्यवहार बंद केला.
याचदरम्यान फडकेने त्यांच्या नावे बँकेतून चार लाख २५ हजारांचे आॅनलाईन कर्ज घेतले. त्यापैकी तीन लाख ८५ हजार रुपये हस्तांतरीत केले. त्यामध्ये फडके याच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यावर २७ सप्टेंबर २०१९ रोजी एक लाख रुपये तर २८ सप्टेंबर २०१९ रोजी डी मॅट खात्यावर एक लाख ३७ हजार ७७१ रुपये याशिवाय त्याचदिवशी कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यावर पुन्हा एक लाख रुपये आणि २९ सप्टेंबर २०१९ रोजी ३३ हजार रुपये फडकेच्या खात्यावर हस्तांतरीत झाले.
……
न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल…..
रमेश यांना शेअर मार्केटचे आमिष दाखवून त्यांच्या नावे कर्ज उचलून फसवणूक झाल्याची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव रमेश यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. अखेर न्यायालयाच्या आदेशाने गुरुवारी सातारा पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला. आता याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक सर्जेराव सानप करत आहेत.
मृताच्या खात्यातून रोकड लांबविल्याचा संशय, महिलेविरुध्द तरुणीची पोलिसात धाव
औरंगाबाद : मृताचे मोबाइल स्वत:च्या नावे पोर्ट करुन महिलेने बँक खात्यातून रक्कम लांबविल्याचा संशय तरुणीने व्यक्त केला आहे. उषा शिवनाथ मस्के उर्फ उषा पाटील उर्फ उषा नरगुडे उर्फ उषा आनंद (रा. प्रतापनगर) असे संशयित महिलेचे नाव आहे. तिच्याविरुध्द उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बन्सीलालनगरातील रामनिवास भंडारी हे उषासोबत प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते. १८ मार्चनंतर भंडारी यांचे आकस्मिक निधन झाले. यावेळी त्यांचे दोन्ही मोबाइल उषा हिच्याकडे होते. या मोबाइलवरुनच बँकांचे आॅनलाईन व्यवहार भंडारी करायचे. उषा हिने भंडारी यांच्या निधनानंतर त्यांचे दोन्ही सीमकार्ड स्वत:च्या नावावर पोर्ट करुन घेतले. सध्या दोन्ही सीमकार्ड उषा वापरत आहे. त्यामुळे तिने भंडारी यांच्या बँक खात्यातील रकमेचा अपहार केल्याचा संशय विनिता रामनिवास भंडारी (२८) यांनी केला आहे. त्यावरुन उषाविरुध्द पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ हे करत आहेत.
पतीच्या उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या महिलेचे घर फोडले, पावणेदोन लाखांचे दागिने, रोख लंपास
चोरटा सीसी टिव्ही कॅमेरात कैद
औरंगाबाद : पतीवर शस्त्रक्रिया सुरु असल्याने रुग्णालयात गेलेल्या महिलेचे घर फोडून चोराने पावणेदोन लाखांचे दागिने व रोख लंपास केली. ही घटना ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री हर्सुल येथील म्हसोबानगरात घडली. विशेष म्हणजे सायकलवर चोरटा आल्याचे सीसी टिव्हीतील फुटेजवरुन स्पष्ट झाले आहे.
हर्सुल भागातील कडूबाई बालाजी चाथे (४५, रा. प्लॉट क्र. १६, म्हसोबानगर) यांच्या पतीवर ८ सप्टेंबर रोजी रात्री रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यामुळे त्या रुग्णालयात देखभाल करण्यासाठी गेल्या होत्या. त्याची संधी साधून चोराने घराचे कुलूप तोडले. त्यानंतर आत प्रवेश करुन चोराने कपाटाचे दरवाजे तोडले. यावेळी चोराने सोन्याची गहू मन्याची पोत, दोन तोळ्याचे पैंडल, सव्वादोन तोळ्याचे शॉर्ट गंठण, प्रत्येकी पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या, पाच ग्रॅमचे पैंडल, दोन मणी मंगळसूत्र, कर्णफुले, डोरले, एक मनी मंगळसूत्र, ज्योती, एक तोळ्याचे मनी, चांदीची चेन, जोडवे आणि बारा हजाराची रोख असा ऐवज लांबवला.
हा प्रकार गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आला. त्यानंतर कडूबाई यांनी तात्काळ हर्सुल पोलिसांना घटनेची माहिती दिली. हर्सुलसह गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी एका सीसी टिव्ही कॅमेरात सायकलवर आलेला चोरटा फुटेजमध्ये कैद झाल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.