CoronaIndiaUpdate : जाणून घ्या काय आहे कोरोनाची देशाची ताजी स्थिती ?

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात ४७,०९२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही रुग्णसंख्या गेल्या दोन महिन्यांत नोंदली गेलेली सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले आहे. १ जुलै रोजी म्हणजेच ६३ दिवसांपूर्वी ४८,७८६ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर चढ-उतार होत असलेली दैनंदिन रुग्णसंख्या २८ हजारांपर्यंत (९ ऑगस्ट) कमी झाली होती.
दरम्यान सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली असून सध्या ३ लाख ८९ हजार ५८३ रुग्णांवर उपचार चालू आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या १.१९ टक्के इतकी नोंदली गेली आहे. गेल्या २४ तासांत या रुग्णांची संख्या ११,४०२ ने वाढली आहे. देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी २८ लाख ५७ हजार ९३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ३९ हजार ५२९ झाली आहे. तर मृत्युदर १.३४ टक्के नोंदला गेला आहे.
कोरोनमुक्तीचा दर ९७.४८ टक्के
देशातील कोरोनामुक्त होण्याची टक्केवारी ९७.४८ इतकी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. आतापर्यंत ३ कोटी २० लाख २८ हजार ८२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दैनंदिन रुग्णवाढीचा दर २.८ टक्के नोंदला गेला आहे. तर साप्ताहिक रुग्णवाढीचा दर २.६२ टक्के इतका नोंदला आहे. गेल्या ६९ दिवसांपासून रुग्णवाढीचा दर ३ टक्क्यांपेक्षा कमी नोंदला गेला आहे. बुधवारी ८१.०९ लाख लोकांचे लसीकरण झाल्याने लस घेणारांची एकूण संख्या ६६.३० कोटी झाली आहे.
राज्यांना ६४.६५ कोटींहून अधिक लसमात्रांचे वाटप
दरम्यान केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत ६४.६५ कोटींहून अधिक ककोरोना प्रतिबंधक लसमात्रांचे वाटप केले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे ४ कोटी ७८ लाख ९४ हजार ३० लसमात्रा शिल्लक असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले. देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाअंतर्गत, केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांद्वारे उत्पादित होणाऱ्या ७५ टक्के लसींचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवठा करते.