WorldNewsUpdate : काबुल विमानतळावर आत्मघातकी हल्ला , १०५ जणांचा मृत्यू , बॉम्बरचा फोटो जाहीर

काबुल : काबूलमधील हामिद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर काल झालेल्या आत्मघाती स्फोटात १३ अमेरिकी सैनिकांसह १०५ जण मारले गेले. आयसीसशी संबंधित आयसिस-के या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून या संघटनेने हा स्फोट घडवणाऱ्या दोन आत्मघातकी बॉम्बरपैकी एकाचा फोटो जाहीर केला आहे.
या हल्ल्याविषयी प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भावुक झाले होते. हल्लेखोरांना धडा शिकवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विमानतळाबाहेरच्या गर्दीत या हल्लेखोराला कुणीही अटकाव केला नाही. त्यामुळे तो अमेरिकी सैनिकांपासून ५ मीटर अंतरावर पोहोचला. तिथे त्याने बॉम्बस्फोट केला आणि १०५ जणांचे प्राण गेले, तर अनेकजण जखमी झाले.
आयसीसकडून जाहीर करण्यात आलेल्या या फोटोत दिसणाऱ्या दहशतवाद्याचं नाव आहे अब्दुल रहमान अल-लोगरी. तोंडावर काळं कापड गुंडाळलेला दहशतवादी दिसतो, ज्याने १०५ जणांचा बळी घेतला. या दहशतवाद्याच्या छातीवर बंदूक लावलेली दिसत आहे. त्याच्यापाशी विस्फोटक बेल्टदेखील दिसतो आहे. इस्लामिक स्टेटच्या झेंड्यापुढे तो उभा असून त्याचे केवळ डोळे या फोटोमध्ये दिसत आहेत. वास्तविक, दोन हल्लेखोरांनी हा हल्ला घडवला होता. मात्र दुसऱ्या दहशतवाद्याचा फोटो मात्र आयसीसनं जाहीर केलेला नाही.
अमेरिकी सैनिकांना टार्गेट करणें, हाच या हल्ल्यामागचा मुख्य उद्देश होता. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सध्या अमेरिकेच्या ताब्यात असणारे एकमेव विमानतळ आहे. अफगाणिस्तानमधील एकूण ४ आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी ३ विमानतळांवर अगोदरच तालिबानने ताबा मिळवला आहे. या विमानतळावर तैनात असणारे अमेरिकी सैनिक नागरिकांचा पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्रं तपासून त्यांना आत सोडण्याच्या तयारीत होते. हा दहशतवादी अमेरिकी सैनिकांच्या अधिकाधिक जवळ येण्याच्या प्रयत्नात होता.