WorldNewsUpdate : अफगाणिस्तान चाललंय काय ? , तालिबांकडून युद्ध समाप्तीची घोषणा, चिनने दिला मैत्रीचा हात !!

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील भारतातील दूतावासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसहीत अफगाणिस्तानात राहणाऱ्या १२९ भारतीय आणि इतर प्रवाशांना घेऊन ‘एअर इंडिया’चं एक विशेष विमान भारतात दाखल झाल्यानंतर पुन्हा उर्वरित नागरिकांच्या सुटकेसाठी काबूलला निघालेल्या ‘एअर इंडिया’च्या विशेष विमानाचे उड्डाण रद्द करण्यातआले आहे. काबूलमधील ‘एअरस्पेस’ बंद करण्यात आल्याने एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान काबूलवर ताबा मिळवताच तालिबान्यांनी युद्ध समाप्तीची घोषणा केली असली तरी अमेरिकन सैन्य आणि तालिबान्यांमध्ये गोळीबार सुरूच असून या गोळीबारात पाच जण ठार झाल्याचे वृत्त आहे.
चिनचा तालीबासमोर मैत्रीचा हात
एकिकडे अफगाणिस्तानमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे सर्व जग स्तब्ध झालेले असताना दुसरीकडे चिनने मात्र तालीबानसमोर मैत्रीचा हात पुढे केला असल्याचे वृत्त आहे.
China says willing to develop 'friendly relations' with Afghanistan's Taliban: AFP News Agency
— ANI (@ANI) August 16, 2021
काबूल काबीज केल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला. दरम्यान, तालिबानशी ‘मैत्रीपूर्ण संबंध’ प्रस्थापित करण्यास चीन तयार असल्याचे म्हटले आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, “चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो आणि अफगाणिस्तानशी मैत्रीपूर्ण आणि सहकार्यपूर्ण संबंध विकसित करु इच्छितो.”
एअर इंडियाचे विमान रद्द
काबूल एअरस्पेसमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि इथून बाहेर पडणाऱ्या नागरी विमानांसाठी एक नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटिशीनुसार, काबुल विमानतळावरील एअरस्पेस सध्या फक्त सेनेसाठी असेल असे आदेश जरी करण्यात आले आहेत. या एअरस्पेसमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरी विमानांना काबूल एटीसीकडून कोणतीही मदत मिळणार नाही, असेही या आदेशात म्हटलं गेले आहे. त्यामुळे परिस्थितीची चाहूल घेत हे उड्डाण तूर्त रद्द करण्यात आले असल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे.
काबूल विमानतळावर पाच जण ठार
दरम्यान अफगाणिस्तानमधून बाहेर पडून जीव वाचविण्यासाठी काबूल विमानतळावर लोकांनी मोठी गर्दी झाली होती. विमानात प्रवेश करण्यासाठी चेंगराचेंगरीही झाली. या जमावाला पांगवण्यासाठी अमेरिकन सैन्याने हवेत गोळीबार केल्याने या गोळीबारात पाच जण ठार झाले असल्याचे वृत्त ‘अल जझीरा’ने दिले आहे. या पाचजणांचा मृत्यू चेंगराचेंगरीत झाला की गोळीबारात झाला, याबाबत काहीही माहिती समोर आली नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पाच जणांचे मृतदेह एका वाहनातून नेण्यात आले.
दरम्यान तालिबान प्रवक्ते मोहम्मद नईमने ‘अल जझीरा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महिलांच्या अधिकाराबाबत भाष्य केले आहे. शरियतनुसार, महिला आणि अल्पसंख्यक घटकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश आता तालीबानी नेत्यांनी दिले असल्याचे वृत्त आहे.
At least 5 people were killed in Kabul airport as hundreds of people tried to forcibly enter planes leaving Kabul, witnesses: Reuters
— ANI (@ANI) August 16, 2021
देश विकल्याची जनरल बिस्मिल्ला मोहम्मदी यांची टीका
अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री जनरल बिस्मिल्ला मोहम्मदी यांनी ट्विटरवरुन थेट नाव न घेता राष्ट्राध्यक्ष अशरफ घानी आणि त्यांच्या धोरणांवर मोजक्या शब्दात टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , “त्यांनी आमचे हात पाठीमागे बांधून ठेवले आणि मातृभूमी विकली. त्या श्रीमंत व्यक्तीचा (राष्ट्राध्यश्र घनी) आणि त्याच्या गटाचा धिक्कार असो.” विशेष म्हणजे अगदी रविवारी सायंकाळपर्यंत मोहम्मदी यांना काबूल लढेल असा विश्वास असल्याचे त्यांच्या या पूर्वीच्या ट्विटमधून त्यांनी सांगितले होते. मात्र सायंकाळी राष्ट्राध्यक्ष घनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत देश सोडून पळून गेल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर काबूलवर तालिबानने ताबा मिळवल्याचे जवळजवळ निश्चित झाले आणि पुढील काही तासांमध्ये शहरामधील जवळजवळ सर्वच कार्यालये आणि अध्यक्षीय प्रासादावर तालिबानने ताबा मिळवला.
अशरफ घनी आहेत कुठे ?
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी रविवारी देशातून पलायन केल्याची माहिती दोन अफगाणी अधिकाऱ्यांनी दिली. यापैकी एकजण माजी अध्यक्ष हमीद करझई यांच्या कार्यालयातील असून, दुसरा अफगाणी सुरक्षा परिषदेवर आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्ला मोहिब आणि एक जवळचा सहकारी यांच्यासह घनी यांनी देशत्याग केला, परंतु ते कुठे गेले, हे तात्काळ कळू शकले नाही. तालिबानने सत्तांतरण केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला असून ते ताजिकिस्तानला रवाना झाले असल्याचे अंगितले जात होते मात्र त्यांचे विमान तेथे उतरण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे अशरफ घनी आता अमेरिकेत जाऊ शकतात. अशा परिस्थितीत अशरफ घनी सध्या ओमानमध्येच असल्याचे वृत्त आहे. अशरफ घनी वगळता अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहिब हेही ओमानमध्ये आहेत. त्यांच्या दोन्ही विमानांना रविवारी ताजिकिस्तानमध्ये उतरण्याची परवानगी मिळू शकली नाही, म्हणून त्यांनी ओमानमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. आता अशरफ घनी येथून अमेरिकेत जाऊ शकतात.
जो बायडेन यांच्या राजीनाम्याची ट्रम्पकडून मागणी
दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानमधील अराजकतेसाठी जबाबदार धरले असून जो बायडेन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी जारी केलेल्या निवेदनात बायडेन यांच्यावर निशाणा साधला असून अफगाणिस्तानमधील अराजकतेसाठी जबाबदार धरत जो बायडेन यांनी राजीनामा द्यायची वेळ आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यावरून अमेरिकेतही तणावाचे वातावरण आहे.
तालिबांकडून युद्ध समाप्तीची घोषणा
अफगाणिस्तानवर तालिबानने संपूर्ण ताबा मिळवल्यानंतर युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. आता अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य परत आले आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलवर ताबा मिळवला. यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आणि अन्य राजकारण्यांनी देश सोडला आहे. यानंतर तालिबानच्या प्रवक्त्याने युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. तालिबानने अफगाणिस्तानातील सरकारी कर्मचाऱ्यांना २० वर्षांपूर्वीसारखेच राहण्याचा इशारा दिला आहे.
अमेरिकेने सैन्य माघारी घेताच तालीबानी सक्रिय
अमेरिकेने ९/११ हल्ल्यासाठी अल कायदाला जबाबदार धरले होते . यासाठी अमेरिकेने २००१ मध्ये अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. अफगाणिस्तानवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने तालिबानला बाहेर करून देशाच्या सुरक्षेसाठी अफगान सुरक्षा दल आणि पोलिसांना विशेष प्रशिक्षण दिले होते. त्यासाठी अमेरिकेने गेल्या २० वर्षातील युद्धात २० खरब डॉलर खर्च केले आणि २,३१२ सैनिक शहीद झाले आहेत. दरम्यान ट्रम्प पायउतार होताच जो बायडेन यांनी १४ एप्रिलला अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याची करावी सुरु केली होती त्यानंतर तालिबानने पुन्हा एकदा मुसंडी मारत अफगाणिस्तानवर कब्जा केला.