MaharashtraPoliticalUpdate : काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावरच लढवणार , नाना पटोले यांचा पुनरुच्चार

मुंबई : राज्याच्या आघाडी सरकारमध्ये आम्ही एकत्र असलो तरी काँग्रेस महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावरच लढवणार आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातील पक्षाच्या भवितव्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ प्रस्तावित केला आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी दिली. कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्यासमवेत नाना पटोले यांनी मंगळवारी राहुल गांधींची भेट घेऊन पक्षाच्या रणनीतीबाबत चर्चा केली होती. दरम्यान पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय असून तो सर्वांना पाळावा लागेल. तसेच कुठल्याही मंत्र्याच्या चुकीचा अहवाल काँग्रेस वरिष्ठांना गेला नाही, असेही पटोले यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत लढणार का ? याबाबतही नाना पटोलेंनी भाष्य केले. निवडणूक तीन वर्षांनंतर आहे. यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. नाना पटोले माध्यमांशी बोलताना पेगॅसस प्रकरणाबाबतही भाष्य केले. “महाराष्ट्रात २०१७-१८ मध्ये फोन टॅपिंग झाले होते. जी काही माहिती असते ती सरकारला भेटतच असते. मध्य प्रदेश व कर्नाटक निवडणुकीत याचाच वापर केला गेला. हे सविधनाच्या विरोधात आहे. गोपनीयतेचा भंग यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून याची चौकशी झाली पाहिजे,” असेही पटोले म्हणाले. आम्ही राज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार आहोत व नंतर त्यांना निवेदन देणार आहोत. राष्ट्रपतींनी यामध्ये हस्तशेप करावा अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे करणार आहोत, असेही पटोले म्हणाले.
दरम्यान केंद्र सरकारने ऑक्सिजन संदर्भात राजकारण करू नये. ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्यूबाबत केंद्र सरकार खोटे बोलत आहे. सर्व सुविधा केंद्र सरकार देणार होते. महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही हे खरे आहे. पण बाजूच्या राज्यात ऑक्सिजन न मिळाल्याने बरेच मृत्यू झाले आहेत. देशात सध्या लसीकरण मोहीम थंडावली आहे. सरकारने पाकिस्तानला लस दिली पण भारतात देता आली नाही. हे सर्व पाप मोदी यांचे आहे, असे पटोले म्हणाले.