IndiaNewsUpdate : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता , दिल्लीत हाय अलर्ट

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या दहशतवादी हल्ल्याची मोहीम दहशतवादी संघटनांनी आखली असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असून या हल्ल्याला थोपवण्यासाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानची दहशतवादी संघटना दिल्लीत मोठा हल्ला करण्याचा मनसुबा आखत असल्याचे वृत्त आहे.
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार स्वातंत्र्य दिनापूर्वी दिल्लीत ड्रोनच्या माध्यमातून मोठा हल्ला घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. संबंधित माहिती मिळताच संपूर्ण दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्थेत कमालीची वाढ करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.
या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाच्या मुख्यालयात एक विशेष ड्रोन कंट्रोल रुम देखील तयार करण्यात आला आहे. तसेच सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ४ अँटी ड्रोन यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी लखनऊमधून अलकायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आळी होती. त्यांच्या चौकशी दरम्यान अनेक महत्वाचे खुलासे झाल्याचेही सांगण्यात येत आहे. अलकायदाकडून मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखली जात होती याची माहिती चौकशीतून समोर आली होती.