CoronaIndiaUpdate : महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनकच , अधिक कठोर निर्बंधाची गरज : पंतप्रधान

नवी दिल्ली : देशात महाराष्ट्र आणि केरळम या राज्यांमधील कोरोनाची साथ नियंत्रणात आली नाही तर फारच गंभीर परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शुक्रवारी दिला. ईशान्येकडील आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यानंतर, मोदी यांनी शुक्रवारी महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना परिस्थितीवर चर्चा केली. रुग्णवाढ अधिक असणाऱ्या राज्यांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक सक्रिय होऊन कठोर निर्बंध लागू केले तरच तिसरी लाट रोखणे शक्य होईल, असे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी या सहाही राज्यांमध्ये दिवसेंदिवस रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत केरळमध्ये १३ हजार ७७३, महाराष्ट्रात ८ हजार १०, तमिळनाडूमध्ये २ हजार ४०५, कर्नाटकमध्ये १ हजार ९७७, आंध्र प्रदेशात २ हजार ५२६ आणि ओडिशामध्ये २ हजार ११० नव्या रुग्णांची नोंद झाली. जुलैमध्ये देशातील एकूण दैनंदिन रुग्णवाढीतील ८० टक्के रुग्णवाढ आणि ८४ टक्के मृत्यूही याच ६ राज्यांमध्ये झाले आहेत, असेही पंतप्रधानांनी बैठकीत सांगितले.
बैठकीत सहभागी झालेल्या राज्यांमध्ये तर अनेक महानगरे आहेत, तेथे लोकसंख्येची घनता तुलनेत खूपच जास्त असून रुग्णवाढीचा धोका अधिक आहे. या शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळली पाहिजे. त्यासाठी राज्य प्रशासनांनी दक्ष राहिले पाहिजे आणि तितक्याच कठोरपणे निर्बंधांची अंमलबजावणी केली पाहिजे, अशी सूचना मोदींनी केली. प्रदीर्घ काळ रुग्णवाढ होत राहिली तर विषाणू उत्परिवर्तित होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे संभाव्य तिसरी लाट रोखाने कठीण होऊन जाईल. नमुना चाचण्यांची संख्या कमी करता येणार नाही, कोरोनाबाधितांवर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संशयित रुग्णांना शोधणेही गरजेचे आहे. यापूर्वी अवलंबलेल्या उपायांवर पुन्हा भर द्यावा लागेल, त्यात आता लसीकरणाचाही समावेश झाला असून या चारही उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मोदी म्हणाले.