CoronaMaharashtraUpdate : बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक पण कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना

मुंबई : राज्यात गेल्या 24 तासात एकूण 7 हजार 761 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यातील एकूण 13 हजार 452 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोनामुक्तांपेक्षा बाधितांचीच संख्या जास्त होती. पण आज जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 59 लाख 65 हजार 644 बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही 96.27% इतकी झाली आहे.
दरम्यान कोरोनामुळे मागील 24 तासांमध्ये 167 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा आता 2.04% इतका झालाय. राज्यातील 5 लाख 85 हजार 967 व्यक्ती होमक्वारटाईन आहेत. तर 4 हजार 576 व्यक्ती संस्थात्मक क्वारटाईन आहेत.
मुंबईतील रुग्णसंख्या
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा घट झालेली दिसतेय. दिवसात मुंबईत एकूण 446 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 470 जण कोरोनामुक्त झालेत. मुंबईत आतापर्यंत 705234 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट हा जैसे थे म्हणजेच 96 टक्के इतकाच आहे. मुंबईत आता एकूण 6 हजार 973 सक्रीय रुग्ण आहेत.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases- 7,761
*⃣Recoveries- 13,452
*⃣Deaths- 167
*⃣Active Cases-1,01,337
*⃣Total Cases till date- 61,97,018
*⃣Total Recoveries till date-59,65,644
*⃣Total Deaths till date-1,26,727
*⃣Total tests till date- 4,50,39,617(1/4)🧵
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) July 16, 2021
दरम्यान राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सर्वसामान्य नागरिकांसह यंत्रणांकडून मोठी बेफिकरी झाली होती. या पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या लाटेनंतरच्या अनलॉक प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावध भूमिकेत असून त्यांनी प्रशासनाला आक्रमक सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील काही प्रतिनिधींशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. या बैठकीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याबाबत कोणतीच चर्चा झाली नाही, उलट कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना
– कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ देऊ नका
– रस्त्यावर फिरणारे नागरिक मास्क घालूनच फिरतील याची दक्षता घ्या
– ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे त्या क्षेत्राला कंटेंमेंट झोन जाहीर करा
– कंटेंमेट झोनमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे कडक पालन करा
– गाव, वाड्या वस्तींवर लक्ष केंद्रीत करा
– कोरोनामुक्त गाव संकल्पनेत चांगले काम होईल यादृष्टीने प्रयत्न करा
दरम्यान जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरू राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे आणि परिपूर्ण आराखडा तयार करावा, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी कामगारांसाठी कंपन्यांच्या समन्वयातून उद्योगस्थळानजीक फिल्ड रेसिडन्शीयल एरिया निश्चित करण्यास सहकार्य करावं, कामगारांना कामाच्या स्थळी जा-ये करण्यासाठी पाँईंट टू पॉईंट वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. ऑक्सिजन निर्मितीसाठी तसंच उद्योग सुरळीत सुरू रहावेत यासाठी उद्योजक करत असलेल्या सहकार्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.