MaharashtraPoliticalUpdate : पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज , बोलून गेले रामदास आठवले

पुणे : पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाल्या आहेत. त्यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. मात्र, चर्चेतून ती नाराजी लवकरच दूर होईल. असा गौप्यस्फोट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे रामदास आठवले यांच्या हस्ते सुपूर्द केल्यानंतर, तसेच उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या कार्यालयास भेट दिल्यानंतर आठवले पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान आपण भाजप सोबतच राहणार असल्याचे सांगून आठवले म्हणाले कि , “रिपब्लिकन पक्षाचे आता पालिकेत पाच नगरसेवक आहेत. तीन उपमहापौर झाले आहेत. स्वबळावर निवडणूक लढून हे यश मिळवणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही भविष्यातही भाजपसोबतच राहणार असून, नगरसेवकांची संख्या वाढवणार आहोत. विधानसभेलाही आम्हाला भाजपच्या साथीने चांगल्या जागा मिळतील,” असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
“राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. तिन्ही पक्ष स्वबळाची आणि मानापमानाची भाषा करतात. आगामी निवडणुकांत राजकीय नुकसान टाळायचे असेल, तर शिवसेनेने पुन्हा भाजपासोबत युती करण्याची आवश्यकता आहे. भाजप व रिपब्लिकन पक्ष एकत्र असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता येणे अवघड आहे. त्यामुळे शिवसेनेने आमच्यासोबत आले पाहिजे,” असेही आठवले म्हणाले.
आठवले पुढे म्हणाले कि , “जातीनिहाय जनगणना करण्याबाबत मी सकारात्मक असून, त्यातून अनेक जातींना आरक्षण नेमके कसे द्यावे, हे निश्चित करणे सोयीचे होईल व सर्वाना न्याय देता येईल. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी राज्याला अधिकार द्यावेत, कायद्यात बदल करावेत. ओबीसींच्या २५ टक्केमध्ये वर्गावारी करून, प्रत्येकास ९ टक्के आरक्षण द्यावे, कोणत्या जाती कोणत्या गटात टाकावेत याचा विचार करावा. आर्थिक दुर्बलांना १० टक्के शिक्षण आणि नोकरीचे आरक्षण मिळेल,” असेही रामदास आठवले यांनी सांगितले.