UttarPradeshNewsUpdate : तीन संशयित दहशतवाद्यांना स्फोटकांसह अटक , पाच फरार , उत्तर प्रदेशात हाय अलर्ट

लखनौ : लखनौमध्ये उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आज लखनऊमध्ये छापेमारी केली. एटीएसने छापा टाकला त्या घरात सात लोक राहत होते आणि त्यातील पाच जण पळून गेल्याच्या वृत्तानंतर लखनऊ व त्याच्या आसपासच्या जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे वृत्त आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. शाहिद खान गुड्डू आणि वसीम अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार शाहिद पाच वर्षांपासून सौदी अरेबियात वास्तव्यास आहे. तो टेलिग्रामद्वारे अल कायदा व पाकिस्तानी हस्तक अल-उल यांच्याशी बोलत होता. त्याला पकडण्यापूर्वी त्याने काही कागद व वस्तू जाळल्याची देखील माहिती समोर आली आहे.
दरम्यान आज दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करत अल कायदा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केल्यावर व मोठ्याप्रमाणावर स्फोटके हस्तगत करण्यात आल्यानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम उत्तरपदेश व्यतिरिक्त हरदोई, सीतापूर, बाराबंकी, उन्नाव आणि रायबरेली या जिल्ह्यांसह लखनऊ आयुक्तालयाच्या हद्दीत दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेवरून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अटक करण्यात आलेले अल कायदाचे दहशतवादी उत्तर प्रदेशमधील लखनऊसह काही जिल्ह्यांमध्ये बॉम्ब स्फोट घडवण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी दोन प्रेशर कुकर बॉम्बसह बरीच स्फोटके व विदेशी पिस्तूलं देखील जप्त केली आहेत.
लखनऊमध्ये दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकास (एटीएस) मिळाली होती. यानंतर तेथील काकोरी पोलीस ठाणे परिसरातील एक घराला एटीएसने वेढा कारवाई करत दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांचा आज किंवा उद्या लखनऊ व उत्तर प्रदेशमध्ये स्फोट घडवण्याचा कट होता अशी माहिती आहे.
या कारवाईबाबत बोलताना उत्तर प्रदेश एटीएसचे आयजी जीके गोस्वामी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश आणि लखनऊमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची दहशतवाद्यांची योजना होती. जिवंत बॉम्ब देखील हस्तगत करण्यात आलेला आहे. संशयित दहशतवाद्यांचे काश्मीर कनेक्शन आहे. हे स्लीपर सेल होते पण आता सक्रीय होऊन काम करत होते. आज किंवा उद्या लखनऊ व उत्तर प्रदेशमध्ये स्फोट घडवणार होते. त्यांच्याकडून बऱ्याचप्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. यांनी एक मोठा कट रचला होता. अनेक दिवसांपासून ते याची तयारी करत होते. असे अनेकजण लपून बसलेले असू शकतात, त्यांचा शोध घेणे सुरू आहे.
Lucknow ATS conducts searches in Kakori. Details awaited. pic.twitter.com/gPcqRbKMmL
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 11, 2021