MaharashtraPoliticalNewsUpdate : महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयी पवारांनी केली हि भविष्यवाणी

मुंबई : . ‘महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टिकेल. इतकंच नव्हे तर लोकसभा, विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचं देशात आणि राज्यात महाविकास आघाडी प्रतिनिधित्व करेल यात शंका नाही,’ अशी भविष्यवाणी शरद पवार यांनी केली आहे. शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असे कोणाला पटले नसते . पण आपण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. तिन्ही पक्षांनी योग्य पावलं टाकली आणि आज महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करत आहे त्यामुळे हे सरकार पुढचे पाच वर्ष टिकणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.
शिवसेनेवर विश्वास आहे
यावेळी बोलताना , जनात पक्षाचे राज्य आले त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेस पराभूत झाली. असे असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला तो म्हणजे शिवसेना. शिवसेनेने इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही, असा निर्णय घेतला, बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणुक न लढवत पाळला अशी आठवण शरद पवारांनी सांगितली. दरम्यान पंतप्रधान- मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर भाष्य करताना पवार पुढे म्हणाले कि , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. त्यावेळी एकांतात मोदींनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली. तेव्हा अनेक शंका घेण्यात आल्या. पण शिवसेना विश्वासाचा पक्ष आहे. शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे.
मराठा आरक्षणावर केले हे भाष्य
या कार्यक्रमात मराठा व ओबीसी आरक्षणावर शरद पवार यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली. ‘सत्ता ही जास्तीत जास्त हातांमध्ये गेली पाहिजे आणि ती तशी जायला हवी असेल तर आरक्षणाचे प्रश्न आपल्याला सोडवावेच लागतील,’ असे सांगून आरक्षणाच्या प्रश्नाबद्दल सविस्तर बोलताना ते म्हणाले, ‘मराठा आरक्षण असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या जागेचा गंभीर प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवावेच लागतील. शेवटी सत्ता ही अधिकाधिक हातात गेली पाहिजे. सत्ता केंद्रीत झाली, एकाच हातात राहिली की ती भ्रष्ट होते. ती भ्रष्ट व्हायची नसेल तर ती अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे. हे सूत्र मान्य असेल तर एससी, एसटी, ओबीसी असतील, यातील प्रत्येकाला घटकाला मी सत्तेचा वाटेकरी आहे असे वाटले पाहिजे. हे सगळे आपण जितके जोमाने करू, तितका राष्ट्रवादी काँग्रेसला लोकांचा पाठिंबा मिळेल.’
ओबीसींना आरक्षण द्यायचा निर्णय माझा
‘मुख्यमंत्री असताना मी ग्रामपंचायतींमध्ये आणि पोलीस पाटील भरतीमध्ये ओबीसींना आरक्षण द्यायचा निर्णय घेतला होता. त्यावेळी जुन्या पिढीतील काही कार्यकर्त्यांनी माझ्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, हा निर्णय चुकीचा का आहे हे त्यांना सांगता आले नाही. उलट, आरक्षणाच्या निर्णयामुळे गावं आधीपेक्षा जास्त एकत्र आलीत. पिढ्यान पिढ्या एकाच घरात असलेली सत्ता विखुरली गेली याबद्दल अनेकांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. असं काम आपल्याला अपेक्षित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष वंचित व उपेक्षित घटकांच्या केवळ पाठीशी राहतो असं नाही. तर व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करतो हा संदेश गेला पाहिजे,’ असं ते म्हणाले.