MumbaiNewsUpdate : कुणाला काय टीका करायचीय ती करू द्या , आता मुंबई तुंबणार नाही : महापौर

मुंबई : मुंबईत जोरदार पावसामुळे हजेरी लावल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे त्यावर मुंबईत पाणी भरणारच नाही, असा दावा कोणीच केलेला नाही आणि आम्ही असा करणार सुद्धा नाही. पूर्वी २ ते ५ दिवस मुंबई ठप्प व्हायची. पण आता तसे होत नाही. आम्ही सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेऊन असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
महापौर पुढे म्हणाल्या कि , ४ तासांच्या आत पाण्याचा निचरा झाला नाही तर नालेसफाई काम चांगलं झालं नाही हे मान्य करावं लागेल. आज एकाच वेळी हायटाईड, सतत मुसळधार पाऊस यामुळे पाणी तुंबले आहे. मुंबईतील पावसाच्या परिस्थितीवर आम्ही आढावा घेतली आहे. १९५ मिली, १३७ मिली पाऊस झाला आहे. ९५ मिली पाऊस झाल्यास अंडरवॉटर पाणी डायव्हर्ट होतो. पण आता बऱ्याच ठिकाणी पाण्याचा निचरा झाला आहे. कुठे निष्काळजीपणा होत असेल तर कारवाई करू. विरोधकांना आरोप करायचे आहेत, ते करू दे, आम्ही उत्तर देत बसणार नाही. निंदकाचे घर असावे शेजारी, ते सांगतील ते ही बघून काम करू. मुळात ट्विटरवर एक स्टँडर्ड आहे. आधी हे चांगल्या लोकांचं मानलं जायचं , आता कचऱ्यासारखा त्याचा वापर होतो. त्यामुळे अशा टीका करणाऱ्यांकडे फारसं कोणी लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यावर पलटवार केला.
दरम्यान रेल्वे अधिकारी हे फारसे समनव्य साधत नाहीत, त्यांच्या भागात जाऊन आम्ही कचरा साफ करतोय. करी रोड इथे पाणी भरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. रेल्वेने काम पूर्ण करायला हवेत नाहीतर आम्हाला तिथे काम करण्याची परवानगी द्यावी. एमएमआरडीए , रेल्वे, आणि इतर प्राधिकरण मुंबईत आहेत, त्यांच्यामुळे आमच्या नागरिकांना त्रास होऊ नये, आम्ही आमच काम करतोय, असेही पेडणेकर म्हणाल्या.