AurangabadCrimeUpdate : ३७ किलो गांजा जप्त , दोन जण गजाआड

औरंगाबाद: परराज्यातून कारमध्ये शहरात गांजा आणून विक्री करणाऱ्या दोन जणांना गुन्हेशाखा पोलिसांनी रविवारी (ता. ६) पहाटे सापळा रचून गजाआड केले तर त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांनी ३७ किलो ३०० ग्रॅम गांजासह १२ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त रवींद्र साळोखे यांनी दिली. श्रीकांत लक्ष्मण बनसोडे (३१), जगन्नाथ श्रीमंत लाटे (३६, दोघे रा.चौधरी कॉलनी, चिकलठाणा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी एक संशयित अंधाराचा फायदा घेऊन पसार होण्यास यशस्वी झाला असून, भिकन कडूबा रिठे (रा. चिकलठाणा बाजारतळ) असे पसार झालेल्या संशयिताचे नाव आहे. कार क्रमांक (एमएच-२०-एए-४४१३) मधून आंध्र प्रदेशातील दाराकोंडा येथून चार जण गांजा घेऊन शहरात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रवींद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहाय्यक फौजदार नंदकुमार भंडारे, पोलिस अंमलदार ओमप्रकाश बनकर, विरेश बने, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, बबन ईप्पर, दादासाहेब झारगड आदींच्या पथकाने केंब्रिज चौकात सापळा लावला होता. पोलिसांना पाहताच कार चालकाने कार बीड बायपासवरून जुन्या व बंद असलेल्या वळण रस्त्याने चिकलठाण्याकडे घातली. पोलिसांनी कारचा पाठलाग करून गोपालनगर येथे कार अडवली. पोलिसांनी श्रीकांत बनसोडे व जगन्नाथ लाटे या दोघांना ताब्यात घेत कारची झडती घेतली असता १ लाख ८६ हजार ५०० रुपये किमतीचा ३७ किलो ३०० ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी कार, गांजा, एक मोबाईल असा एकूण १२ लाख ४६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.