आ. इम्तियाज जलील यांनी केलेली पाच कामे सांगावीत आम्ही त्यांना खा. खैरे यांची १० कामे सांगू : आ. संजय सिरसाट

इम्तियाज जलील यांनी आपल्या मतदारसंघात केलेली पाच कामे आधी सांगावी, मग आम्ही त्यांना खासदारांनी केलेल्या दहा कामांची यादी देऊ अशा शब्दांत शिवसनेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर पलटवार केला. दोन गेटच्या दुरुस्तीपलीकडे एकही काम न करणाऱ्या इम्तियाज जलील यांना आम्ही काय केले हे विचारण्याचा अधिकार नाही. जनतेला आम्ही बांधील असल्यामुळे त्यांनाच उत्तर देऊ असा टोला देखील शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांना लगावला.
एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन खैरेंनी वीस वर्षात केलेली दहा कामे सांगवी मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही असे आव्हान दिले होते. यावर शिवसेनेकडून आमदार संजय शिरसाट यांनी आज उत्तर दिले. ते म्हणाले, जिल्ह्यात अनेक विकासकामे झालेली आहेत, ती आम्ही जनतेसमारे ठेवूच. पण ज्यांनी पाच वर्षात आपल्या मतदारसंघात काहीच कामे केली नाही त्यांनी आम्हाला जाब विचारण्याचा भानगडीत पडू नये. मतदारसंघातील दोन गेटची दुरुस्ती यापलीकडे आपले काम काय ? ज्या गेटची दुरुस्ती झाली ती देखील सरकारी पैशातून. हा निधी देखील मंजूर झाला तो प्रदीप जैस्वाल आमदार होते त्याकाळात. मग तुम्ही काय केले? असा खरा प्रश्न आहे.
शिवसेनेच्या खासदारांनी वीस वर्षात केलेली दहा कामे सांगा असा प्रश्न विचारणाऱ्या इम्तियाज जलील यांनीच आधी त्यांनी केलेल्या पाच कामांची नावे सांगावी, मग आम्ही त्यांना खैरेंनी केलेल्या दहा कामांची यादी देऊ अशा भाषेत आमदार संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर पलटवार केला.