IndiaNewsUpdate : योगगुरु रामदेव यांच्या विरोधात १ हजार कोटींच्या अब्रुनुकसानीचा दाव्याचा इशारा

नवी दिल्ली : अॅलोपॅथी उपचार पद्धती आणि डॉक्टरांच्या विरोधात वक्तव्य करणारे योगगुरु रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत.
या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता आयएमएच्या उत्तराखंड शाखेने योगगुरु रामदेव यांना नोटीस पाठवली आहे. अब्रुनुकसानीसाठी १ हजार कोटींची भरपाई द्यावी लागेल, असे या नोटीसीमध्ये म्हटले आहे.
१५ दिवसात माफी मागा
अॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर केलेल्या टीकेप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. जर १५ दिवसात माफी मागितली नाही, तर १ हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला जाईल असे यात सांगण्यात आले आहे.
योगगुरु रामदेव यांना समोरासमोर बसवून प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार असल्याचे आयएमए उत्तराखंड शाखेचे सचिव डॉ. अजय खन्ना यांनी सांगितले. “योगगुरु रामदेव यांना अॅलोपॅथीबद्दल जराही ज्ञान नसून तोंडात जे येईल ते बरळत असतात. त्यांच्या वक्तव्यांमुळे आमचे मानसिक खच्चीकरण होत आहे. कोरोनाकाळात आम्ही दिवसरात्र रुग्णांची सेवा करत आहोत. योगगुरु रामदेव तथ्यहीन दावे करत आहे. यासाठी नोबेल पुरस्कार दिला पाहीजे”, अशी खोचक टीका आयएमए उत्तराखंड शाखेचे सचिव डॉ़. अजय खन्ना यांनी केली. आयएमए उत्तराखंड शाखेने यापूर्वी योगगुरु रामदेव यांच्याविरोधात तातडीने कारवाई करावी अशी मागणी करत उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह यादव यांनाही पत्र लिहीले होते.
अॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेलं वादग्रस्त विधान मागे घेतल्यानंतर योगगुरु रामदेव यांनी अॅलोपॅथी औषध कंपन्या आणि इंडियन मेडिकल असोसिएशला २५ प्रश्न विचारले होते. काही आजारांवर ठोस उपाय आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले होते. तसेच अॅलोपॅथीत उपचार इतके गुणकारी आहेत, तर अॅलोपॅथी डॉक्टरांनी आजारी पडणे योग्य वाटत नाही, असा टोलाही हाणला होता. थॉयरॉइड, ऑर्थरायटीस, कोलायटिस, दमा आणि हेपेटायसिस यासारख्या आजारांवर एक एक करत त्यांनी २५ प्रश्न विचारले होते. या प्रश्नाचे पत्रक त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहे.
योगगुरु रामदेव यांनी एका व्हायरल व्हिडिओत कोरोनाच्या मृत्यूमागे अॅलोपॅथी कारण असल्याचे सार्वजनिकरित्या सांगितले आहे. कोरोना रुग्णांवर अॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे करोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनीही त्यांच्या वक्तव्याप्रकरणी संताप व्यक्त करत विधान मागे घेण्यास सांगितलं होते. त्यानंतर योगगुरु रामदेव यांनी विधान मागे घेतले होते. मात्र वाद शमण्याऐवजी वाढतच चालल्याचे दिसत आहे.