IndiaCoronaUpdate : देशातील काही शहरात परिस्थिती हाताबाहेर , टास्क फोर्सचा लॉकडाऊनचा सल्ला

नवी दिल्ली : देशात एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकारसमोरील अडचणीत वाढ झाली आहे . दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. परिस्थिती बिघडू लागल्याने अनेक राजकीय नेते आणि तज्ज्ञाकडून मोदी सरकारला देशात लॉकडाउन लावण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे केंद्र सरकार देशात लॉकडाउन लावणार का ? अशी विचारणा होत असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.
बुधवारी निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी पत्रकार परिषदेदरम्यान लॉकडाउनच्या पर्यायावर चर्चा सुरु असल्याची माहिती दिली. व्ही के पॉल हे टास्क फोर्सचे प्रमुखदेखील आहेत. एकीकडे अनेक तज्ज्ञ आणि राजकीय नेते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबत लढण्यासाठी पंतप्रधानांना लॉकडाऊन लावण्याचा सल्ला देत असताना निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी सांगितले की, “१० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी दर आणि ६० टक्क्यांहून आयसीयू बेड्सची व्याप्ती असणाऱ्या राज्यांना आधीच नाईट कर्फ्यू आणि कठोर निर्बंध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत”.
“स्पष्ट आणि संतुलित नियमावली देण्यात आली आहे. त्याचवेळी अजून काही निर्बंध वाढवण्याची गरज असेल तर त्या पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो आणि गरजेप्रमाणे ते निर्णय घेतले जातील,” असे व्ही के पॉल यांनी सांगितले आहे. दरम्यान याबाबत राज्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे यापूर्वीच देण्यात आली असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.
संपूर्ण लॉकडाउन हा एकमेव पर्याय नसून अनेक गोष्टी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले होते . योग्य ठिकाणी लक्ष्य देत आणि समन्वय साधत परिस्थितीला हाताळणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले होते. “उचलण्यात येणारी पावलं स्थानिक स्थितीच्या आधारे वेगळी असू शकतात. ज्या ठिकाणी संसर्ग वेगाने पसरत आहे तिथे अनेक निर्बंध आणावे लागतील. तर जिथे संख्या कमी आहे तिथे कदाचित योग्य निर्बंध असतील,” असं टास्क फोर्सने म्हटलं होतं.
संपूर्ण लॉकडाउनची मागणी केली जात असली तरी हा पर्याय नसल्याचे टास्क फोर्सने सांगितलं आहे. तसंच देशाची झोनमध्ये विभागणी करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये कमी, मध्यम आणि हॉटस्पॉट्स अशी विभागणी असेल.