MPSC News Update : मोठी बातमी : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची रविवारी होणारी परीक्षा लांबणीवर

मुंबई : अखेर राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने MPSC येत्या रविवारी ११ एप्रिल रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नवी तारीख आयोगामार्फत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा येत्या रविवारी होणार होती. ती तूर्त स्थगित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात तातडीने बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला आहे.
महाराष्ट्रात १०९ उपकेंद्रांवर परीक्षा होणार होती. या परीक्षेसाठी ४२ हजार ७०० उमेदवारांनी नोंदणी केली आहे. प्रशासनाने यासंदर्भातील तयारीही केली होती, मात्र राज्यातील करोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. सरकारी यंत्रणेवरही यामुळे ताण होता. त्यामुळे ही परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी होत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत ही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत बैठकीत सकारात्मक निर्णय .
#mpsc #postponedmpsc #postponempsc pic.twitter.com/NkuJRRMMK3— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) April 9, 2021
राज्यातील काही कॅबिनेट मंत्र्यांनी 11 एप्रिल रोजी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली होती. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तसंच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एप्रिल महिन्यामध्ये रुग्णसंख्येचा वाढता आलेख पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा रद्द करून नव्याने नियोजन करावं, अशी मागणी केली होती.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही परीक्षा पुढे ढकलावी, उमेदवारांमध्ये करोना संसर्गाची भीती आहे, अशी विनंती आव्हाड यांनी सरकारकडे केली होती. राज्यातील अंशत: लॉकडाऊन स्थितीमुळे अनेक अभ्यासिकाही बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे उमेदवारांकडूनही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. काही दिवसांपूर्वी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली जाऊ नये या मागणीसाठी उमेदवारांनी मोठे आंदोलन केले होते. मात्र तेव्हाच्या करोना संसर्ग स्थितीहूनही राज्यातील सध्याची स्थिती बिकट असल्यानेच ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती . यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनही केला होता.