राज्य सरकारच्या निर्बंधांचा निषेध ; नागपुरात व्यापारी रस्त्यावर

राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर निर्बंध घातले आहेत. त्या निर्बंधांची अमलबजावणी सोमवारी रात्री ८ पासून प्रत्यक्ष सुरू झाली आहे. दरम्यान नागपुरमध्ये लॉकडाउनला विरोध करत व्यापारी रस्त्यावर उतरले होते. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने शाहीद चौक परिसरात तणाव निर्माण झाला होता.
मंगळवारी सकाळपासून इतवारी मधील शहीद चौकातील बाजारपेठत व्यापारी व कामगार मोठ्या संख्येने एकत्र आले आणि दुकाने सुरू केली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी दुकाने बंद करण्यास सांगितले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शहीद चौकात विरोध करत आंदोलन केले. किराणा मालाच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे त्याप्रमाणे आम्हालाही परवानगी दिली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यामध्ये सराफा व्यापारी, कपडे विक्रेते, भांडी विक्रेते अशा अनेकांनी सहभाग घेतला होता. व्यापारी आपापल्या दुकानांसमोर उभे राहिले होते. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने शाहीद चौक परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली. तसेच, ठाण्यातही व्यापाऱ्यांकडून लॉकडाउनला विरोध करण्यात आला. नौपाडा पोलिसांनी याप्रकरणी १० व्यापाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे रत्नागिरीतही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. पण कारवाईच्या इशाऱ्यानंतर दुकाने बंद करण्यात आली.