MumbaiNewsUpdate : परमवीर सिंह यांच्या “त्या ” खळबळजनक पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाचा खुलासा

मुंबई । माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राने राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. परमवीर सिंह यांच्या नावाने पाठवण्यात आलेला ईमेल नक्की त्यांनीच पाठवला आहे का, याबाबतच सर्वात आधी तपास करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.
Letter from Param Bir Singh was received at 4:37 pm today via a different email address, not his official one & was without his signature. The new email address needs to be checked. Home Ministry is trying to contact him for the same: Chief Minister's Office, Maharashtra
— ANI (@ANI) March 20, 2021
या खुलाशात मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे कि , ‘गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परमवीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परमवीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे , त्याचप्रमाणे परमवीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
‘वास्तविक पाहता परमवीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता [email protected] असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येते,’ असंही मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
आपल्यावर झालेल्या गंभीर आरोपाबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही लगेच स्पष्टीकरण दिलं आहे.’स्फोटकं तसंच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत आहे. त्यामुळे परमवीर सिंह यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे,’ असा दावा अनिल देशमुख यांनी ट्वीट करत केला आहे.