PuneNewsUpdate : पुण्यात कोरोनाबाधितांना बेडचा तुटवडा

पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांचा संसर्ग वाढतच असून हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे शिवाजीनगरचे जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्यावर्षी ९ मार्चला पुण्यात राज्यातला पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. त्यानंतर कोरोना वाढत गेला. आता वर्षभरानं पुन्हा एकदा तीच परिस्थिती ओढवली आहे.
राज्यात बुधवारी आजवरची सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्यावाढ झाली. त्यामुळे आता कठोर उपाययोजना राबवण्यास पुणे महापालिकेनं सुरूवात केली आहे. पीएमपीएलची प्रवासी संख्या, बगिचे, दुकानं, बाजारपेठांच्या वेळा यावर निर्बंध आणण्याबाबत विचार सुरु आहे. कोरोना रुग्ण वाढल्यानं पुण्यात सध्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही आहेत. पुण्यात सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समध्ये सुमारे 1 हजार बेड्स उपलब्ध आहेत. मात्र विशिष्ट हॉस्पिटलमध्येच दाखल करून घेण्याचा रुग्णांचा आग्रह असतो, असं महापौर सांगतात. लवकरच शिवाजीनगरचं जंबो कोविड हॉस्पिटल देखील पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.