CoronaNewsUpdate : दिलासादायक : बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबई : गेल्या २४ तासात तब्बल १२ हजार १८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिवसभरात ९ हजार ९२७ नवीन रुग्णांची भर पडली असून आज राज्यात ५६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या करोनाचे ९५ हजार ३२२ अॅक्टिव्ह रुग्ण असून सलग दोन दिवस नवीन बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक झाली असल्याचे दिलासादायक वृत्त आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जनता कर्फ्यू, अंशत: लॉकडाऊन, नाइट कर्फ्यू व अन्य कठोर निर्बंध स्थानिक पातळीवर लागू करण्यात येत आहे. या स्थितीत गेले दोन दिवस कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. राज्याची आजची आकडेवारी पाहिल्यास आज ५६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा आता ५२ हजार ५५६ इतका झाला आहे. राज्यातील कोरोना मृत्यूदर सध्या २.३५ टक्के इतका आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ९ हजार ९२७ इतके नवे कोरोना बाधित आढळले असून दिवसभरात १२ हजार १८२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण २० लाख ८९ हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९३.३४ टक्के इतके आहे.
आतापर्यंत राज्यात कोरोनाच्या १ कोटी ७० लाख २२ हजार ३१५ चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यात २२ लाख ३८ हजार ३९८ (१३.१५ टक्के ) इतक्या चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यातील होम क्वारंटाइन व्यक्तींची संख्या वाढत चालली असून आज हा आकडा ४ लाख ५७ हजार ९६२ इतका झाला आहे तर ३ हजार ८२७ व्यक्ती सध्या संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आज ९५ हजार ३२२ इतकी असून त्यात सर्वाधिक १८ हजार १३७ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात सध्या ११ हजार ८११ रुग्णावर उपचार सुरू असून ठाणे जिल्ह्यात १० हजार ३३७ तर मुंबई पालिक हद्दीत ९ हजार ३३० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.