CoronaNewsUpdate : राज्यातील ४ शहरे डेंजर झोनमध्ये, कोरोनाला गांभीर्याने घ्या…

मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत राज्यात ८ हजार ९९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ६० जणांना करोनामुळे प्राणास मुकावे लागले आहे. दरम्यान, नवीन बाधित आणि करोनामुक्तांच्या संख्येतील फरक वाढत चालल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून ८५ हजारपार गेली आहे. हा आकडा चिंतेत भर घालणारा ठरला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर या चार जिल्ह्यांत करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यातही शहरी भागात करोनाची स्थिती गंभीर बनत चालली आहे. करोना चाचण्या वाढवण्यात आल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे सांगितले जात असले तरी अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा फुगत चालल्याने व ९५ टक्क्यांपर्यंत गेलेला रिकव्हरी रेटही ९३ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने चिंता वाढू लागली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाकडून करोनाची आजची आकडेवारी जारी करण्यात आली असून त्यातील आकड्यांतून करोनाचा वाढता धोका स्पष्टपणे दिसत आहे. राज्यात आज ६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत या संसर्गाने राज्यात ५२ हजार ३४० जणांचा बळी घेतला आहे. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.३९ टक्के एवढा आहे. आज राज्यात ८ हजार ९९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ६ हजार १३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण २० लाख ४९ हजार ४८४ करोनावर मात करण्यात यश मिळवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) आता ९३.६६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६५ लाख ९६ हजार ३०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ८८ हजार १८३ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात होम क्वारंटाइन व्यक्तींची संख्या वाढत आहे. हा आकडा आता ३ लाख ९१ हजार २८८ इतका झाला आहे तर ४ हजार १०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली असून आज ही संख्या ८५ हजार १४४ इतकी झाली आहे. त्यात सर्वाधिक १७ हजार ५२२ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ९०४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. करोनाचा नवा हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्ह्यातही करोनाचा जोर कायम असून अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १० हजार ६६२ वर पोहचली आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईत आज १ हजार १०४ नवीन बाधितांची नोंद झाली असून सध्या एकूण ९ हजार ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर ठाणे जिल्ह्यात हा आकडा ९ हजार १४२ इतका झाला आहे. अमरावतीतील रुग्णसंख्या मात्र थोडीशी नियंत्रणात येत आहे. तिथे लॉकडाऊनचा फायदा दिसू लागला आहे. आजच्या नोंदीनुसार तिथे ५ हजार ५११ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.