डॉक्टरच्या घरातून १०० तोळे सोने चोरी गेल्याच्या शक्यतेने पोलिस यंत्रणा हलली

औरंंगाबाद : सोनसाखळी, मंगळसूत्र आणि दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांपुढे हतबल झालेले औरंगाबादचे पोलीस बुधवारी (दि.२४) एका महिला डॉक्टरच्या घरातून १०० तोळे सोने आणि दहा लाख रुपये रोख ऐवजाची चोरी झाल्याची माहिती कळताच अक्षरशः हलले होते. पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्रथमदर्शनी चोरीचा प्रयत्न असून ऐवज पळवल्याचा प्रकार घडला नसल्याचे उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी सांगितले.
प्रतापनगरातील जागृत हनुमान मंदिरासमोर दंत चिकित्सक डॉ. सुषमा सोनी यांचे घर आहे. त्यांचे पती जयंत सोनी हे वाळूजमध्ये एक कंपनी चालवतात. सोनी दाम्पत्याला दोन मुली असून त्यातील एकीच्या मणक्याशी संबंधित आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्व कुटुंब तिरुपतीला गेलेले आहे. घराकडे लक्ष ठेवण्यासाठी एक कर्मचारी असून तो सकाळी ९ च्या सुमारास आला तेव्हा त्याला मुख्य हॉलचा दरवाजा तोडलेल्या अवस्थेत दिसला. त्याने सोनी दाम्पत्याला माहिती दिली. चोरीच्या शक्यतेने सोनी दाम्पत्याने प्रथम १०० तोळे व दहा लाख रुपये चोरी गेला असा अंदाज व्यक्त केला. त्यासंदर्भातील माहिती उस्मानपुरा पोलिसांना कळवली. त्यानंतर या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, दीपक गिऱ्हे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रविंद्र साळोखे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप तारे, सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासह श्वान पथक, ठसे तज्ञ आदींचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. सोनी दाम्पत्याकडून त्यांच्या एका निकटवर्तीय आणि सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याने घरातील सर्व किंमती वस्तुंची पाहणी करून त्याची माहिती सोनी दांम्पत्याला दिली. सोनी दांम्पत्याने कोणतीही वस्तू चोरीला गेली नसल्याचे सांगितल्यावर पोलिसांसह उपस्थित सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करून संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली जाणार असल्याचे उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी यावेळी सांगितले.