लग्न घरातून दागिने चोरी, अटकेची भिती दाखवताच दागिने प्रकटले

औरंगाबाद – मुलाच्या लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांनी एक तोळ्याची एकदाणी आणि दोन तोळ्यांची बोरमाळ लंपास केल्यानंतर न घाबरता धिटाईने महिलेने सातारा पोलिसांच्या मदतीने जादूई पध्दतीने दागिने परत मिळवले.
सातारा परिसरातील तक्षशिला नगरात आशा कौतिक निकाळजे(४५) यांच्या मुलाच्या लग्नासाठी पाहुणेरावळे जमा झाले. पण त्यातीलच एका पाहुण्याने तीन तोळ्यांचे दागिने लंपास करत आशा निकाळजेंना धक्का दिला. पण आशा यांनी न डगमगता सातारा पोलिसांना फोन केला. पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी घटनेची रुपरेषा जाणून घेतल्यानंतर सर्व पाहुण्यांना एकत्र बोलावून समुपदेशन केले. दागिने परत करण्याची विनंती केली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक माळाळे यांनी पीएसआय शेवाळे तसेच पोलिस कर्मचारी जायभाये, चौहान, लोंढे, सोनवणे यांच्यासह भेट दिली. व घरातील पाहुण्यांना चौकशी होणार असल्याचे सांगून पोलिस ठाण्यात माघारी परतले. जातांना आशा निकाळजे यांना गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात ताबडतोब या आम्ही वाट पहातोय असे सांगताच पोलिस सातारा पोलिस ठाण्यात पोहोचे पर्यंत आशा निकाळजेंनी दागिने परत मिळाल्याचा फोन केला. पोलिस निरीक्षक माळाळे यांच्या अनोख्या शैलीने या प्रकरणावर पडदा फाश केला.