एकनाथ खडसे यांना पुन्हा सीडीची आठवण !!

‘तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन’, असे मागे मी गमतीने बोललो होतो. मात्र, खरोखरच त्यांनी माझ्या मागे ईडी लावली आहे. त्यामुळे आता मला सीडी लावावीच लागेल. सीडी लावण्याचे काम आता बाकी आहे’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी कोणाचेही नाव न घेता भाजपला इशारा दिला. भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघात जामनेर येथे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात खडसे यांनी हा इशारा दिला.
राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू आहे. सध्या ते जळगाव जिल्ह्यात आहेत. या दौऱ्यादरम्यान जामनेर येथे संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना खडसे यांनी ईडी चौकशीवरून जोरदार निशाणा साधला. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा जयंत पाटील यांनी एक विधान केले होते. तुमच्यामागे आता ईडी लागू शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. त्यावर त्यांनी ईडी लावली तर मी त्यांची सीडी लावेन असे म्हणालो होते. आता प्रत्यक्षात माझी ईडी चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता मी सीडी लावण्याचे काम करणार आहे, असे सांगत खडसे यांनी मोठ्या गौप्यस्फोटाचे पुन्हा एकदा संकेत दिले आहेत.