राज्याला १ लाख १४ हजार कोटींची तूट विभागांनी काटकसर सुरू करावी – अजित पवार

कोरोनाच्या संकटामुळे राज्यात यावेळेस वर्षांत १ लाख १४ हजार कोटी आर्थिक तूट आली आहे. पुढील दोन महिन्यांत सर्वच विभागांनी काटकसर सुरू करावी, असे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या वित्तीय स्थितीबद्दल घेण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण करताना सांगितले आहे.
कोरोनाचे संकट असतानाही शेतकरी कर्जमाफी, नैसर्गित आपत्तीग्रस्तांना नुकसान भरपाई, कोरोनावरील उपाययोजनांवरील खर्च, आमदार निधीसाठी राज्य सरकारकडून देण्यात आलेला खर्च, यामागे राज्याने कुठंही हात मागे घेतला नाही. त्यामुळे १ लाख १४ हजार कोटींची आर्थिक तूट राज्याच्या तिजोरीत आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण करताना अजित पवार यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या अर्थसंकल्पाला कात्री लावावी लागली. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी सुमारे १२ हजार कोटी रुपये दर महिन्याला खर्च करावा लागत होता. तसेच २५ हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजना राज्य सरकारने पूर्ण केली. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्यांना सुमारे २५ हजार कोटी रुपयांचे वाटप केले, असेही अजित पवार यांनी सांगितले.
”कोरोनाच्या संकटात प्रत्येक आमदारांनी तीन कोटींचा निधीही देण्यात आला. तसेच जिल्हा विकास नियोजनांचा निधीही देण्यात आला. अत्यावश्यक योजनांवर राज्य सरकारने खर्च केला आहे. राज्याला १ लाख १४ हजार कोटींची तूट आली आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांसाठी सर्व विभागांनी आर्थिक काटकासर करावी”, असेही अजित पवारांनी सांगितले.