दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून मिरवणारा गजाआड

औरंंगाबाद : दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणाऱ्यास नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई ८ फेब्रुवारी रोजी दुपारी क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. नंदकुमार बाबूलाल डांगर (रा.सिडको एन-३) असे दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणाऱ्या वाहनधारकाचे नाव आहे.
गेल्या काही दिवसापासून शहरात वाहन चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून वाढत्या वाहन चोऱ्या रोखण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्या आदेशाने सोमवारपासून दररोज दुपारी नाकाबंदी मोहिम राबविण्यात येत आहे. क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे कर्मचारी नाकाबंदी मोहिम राबवत असतांना नंदकुमार डांगर हे दुचाकी क्रमांक (एमएच-१८-एएस-१४९०) वर संशयास्पदरित्या जात होते. पोलिसांनी डांगर यांना थांबवून वाहनाच्या कागदपत्राविषयी विचारले असता ते उडवा-उडवीची उत्तरे देत होते. पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेल्या ई-चलान मशिनवर गाडीचा क्रमांक टाकला असता तो बनावट असल्याचे निदर्शनास आले.
नंदकुमार डांगर यांच्याजवळ असलेल्या दुचाकीचा मुळ क्रमांक (एमएच-४१-झेड-८१६७) असा असतांना डांगर यांनी त्यावर बनावट क्रमांक टाकून दुचाकी वापरत होते. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे अंमलदार विलास वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदकुमार डांगर यांच्याविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.