बीड बायपासवर आता ३० क़िमी वेग मर्यादा पाळा – पोलिस आयुक्त डॉ.गुप्ता

औरंंगाबाद : बीड बायपास हा मृत्यूचा सापळा ठरत असून या रस्त्यावरील वाढत्या अपघाताला रोखण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी जड वाहनांसह सर्व वाहनांची वेग मर्यादा ही ३० क़ि मी. ऐवढी पाळण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी दिली आहे.
महानुभव अश्रम ते गुरूलॉन्स या मार्गावर धावणाऱ्या वाहनांसाठी ही वेग मर्यादा राहील. यातून रुग्णवाहिक, पोलीस वाहन, अग्निशामक दलाचे वाहन यांना सुट राहणार आहे. अशी माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी दिली आहे. बीड बायपास रोडवरील महानुभव आश्रम ते गुरूलॉन्स या मार्गावर ४० कि.मी. वेगापेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची संख्या वाढत असल्याचे पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी वाहनांची वेगमर्यादा ३० कि.मी. ऐवढी पाळण्याचे निर्देश दिले आहेत. ३० कि.मी. पेक्षा जास्त वेगाने धावतांना वाहन दिसून आल्यास त्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी वाहतूक शाखेला दिले आहेत.
दरम्यान, बीड बायपास रोडवरून धावणाऱ्या वाहनांची वेगमर्यादा मोजण्यासाठी बीड बायपास रोडवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने स्पीडगन लावण्यात येणार आहे. तसेच शहर वाहतूक शाखेच्या अत्याधुनिक इंटर सेप्टर वाहनाची देखील वेगमर्यादा मोजून कारवाई करण्यासाठी मदत घेण्यात येणार आहे.