जुन्या वादातून गळ्यावर चाकूने वार

औरंगाबाद : जुन्या वादातून मजुरावर दोघांनी मिळून चाकूने गळ्यावर वार केला. ही घटना १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मिलिंदनगरातील अण्णाभाऊ साठे चौकात घडली. अर्जुन प्रेम डुलगज (वय ३०, रा. गल्ली क्र. १, मुरलीधर नगर, उस्मानपुरा) असे जखमी मजुराचे नाव आहे. अर्जुन डुलगज हे आरोपी सुरेश भीमसिंग टाक (रा. अण्णाभाऊ साठे चौक, मिलिंद नगर) व शंकर भीमसिंग टाक हे मित्र आहेत. सुरेश आणि शंकर यांचे भांडण बघण्यावरून व जुन्या वादातून दोघांनी अर्जुनच्या गळ्यावर चाकूने वार केला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जमादार बोडले करत आहेत.
नामांकित कंपनीच्या बनावट बिडीची विक्री
औरंगाबाद : नामांकित कंपनीच्या नाव वापरून बनावट बिडीची विक्री करणाऱ्यास पोलिसांनी २ पेâब्रुवारी रोजी पकडले. ही कारवाई बारापुल्ला गेट जवळील जकी किराणा स्टोअर्स येथे करण्यात आली. सय्यद जफर सय्यद मोहम्मद (वय ४२, रा. बारापुल्ला गेट, मिलकॉर्नर) असे पोलिसांच्या ताब्यातील आरोपीचे नाव आहे.
सय्यद जफर हा साबळे-वाघिरे अँड कंपनी प्रा.लि. या कंपनीचे नाव वापरून बनावट संभाजी बिडी विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी त्याला किराणा दुकानात २ फेब्रुवारी रोजी पकडले. त्याच्या ताब्यातून संभाजी बिडीचे बनावट ८२ पाकीट असा २६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबई येथील अधिकारी अनुप संभाजी कोलप (वय ४४, रा. आशियारा रोड, जोगेश्वर) यांच्या तक्रारीवरून कॉपीराईट अॅक्टनुसार बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक बोडखे करत आहेत.
महावितरणचा लाचखोर कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला
औरंंगाबाद : तक्रारदाराच्या घरातील खराब झालेले वीजेचे मिटर बदलून देण्यासाठी २ हजार रूपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला अॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.३) दुपारी छावणी परिसरात करण्यात आली. परमेश्वर उत्तम चव्हाण (वय ३६, रा.भारत माता कॉलनी, देवळाई परिसर) असे लाचखोर कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांचे पडेगाव परिसरात घर असून घरातील विजेचे मिटर खराब झाल्याने त्यांनी खडकेश्वर कार्यालयातील मीटर रिडर परमेश्चर चव्हाण यांच्याशी संपर्वâ साधला होता. त्यावेळी चव्हाण यांनी तक्रारदारांना खराब मिटर बदलून देण्यासाठी २ हजार ५०० रूपयांची लाच मागीतली होती. तडजोडीअंती २ हजार रूपये देण्याचे ठरले होते. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली होती.
अॅन्टी करप्शन विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर अधीक्षक डॉ.अनिता जमादार, उपअधीक्षक बी.व्ही.गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शुभांगी सुर्यवंशी, पोलिस अंमलदार गोपाल बरंडवाल, प्रकाश घुगरे, कपील गाडेकर, चांगदेव बागूल आदींच्या पथकाने सापळा रचून २ हजार रूपयांची लाच घेणाऱ्या परमेश्वर चव्हाण याला ताब्यात घेतले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी विविध भागातून तीन दुचाकी लांबवल्या
औरंंगाबाद : शहराच्या विविध भागातून चोरांनी तीन दुचाकी लांबवल्या. निखिल प्रशांत शेवाळे (वय २१, रा. जयनगर उस्मानपुरा) हा २९ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सातारा परिसरातील सुखमणी कॉम्पलेक्स येथे मित्राच्या घरी गेला होता. त्याठिकाणी त्याने दुचाकी (एमएच-२०-एफक्यू-३९३४) घरासमोर उभी केली होती. अवघ्या तासाभरात चोराने त्याची दुचाकी हँडल लॉक तोडून लांबवली. तर मिर्झा अश्फाक रहेमान मिर्झा मुनिर (वय ३७, रा. चेलीपुरा) यांनी २३ जानेवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास युनूस कॉलनीतील जमाते इस्लामी कार्यालयासमोर दुचाकी (एमएच-२०-डीपी-५६८५) उभी केली होती. त्यानंतर ते कामानिमित्त निघून गेले. सायंकाळी सातच्या सुमारास परत येईपर्यंत चोराने त्यांची दुचाकी हँडल लॉक तोडून लंपास केली. तसेच सिंचन विभागातील सेवानिवृत्त हरिभाऊ भाऊराव खिल्लारे (६८, रा. प्लॉट क्र. ए-८९, नाथनगर) यांच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी (एमएच-२०-एडी-७३७२) मध्यरात्री चोराने हँडल लॉक तोडून लांबविली. या प्रकरणी अनुक्रमे सातारा, जिन्सी व जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.