AurangabadSpecialUpdate : कळीचा मुद्दा : नामांतराच्या मुद्यावरून औरंगाबादकरांना काय वाटते ?

अमित पुजारी । महानायक वृत्त सेवा । औरंगाबाद
औरंगाबाद शहरात सध्या नामांतर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर करण्यासाठी भाजपने राजकारणाला सुरुवात केल्यानंतर महाविकास आघाडीकडून त्यावर उलट -सुलट प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. या विषयावर सामान्य नागरिक आणि व्यापारी वर्ग या विषयावर फारसे बोलण्यात रस दाखवताना दिसत नाहीत. परंतु मनपा कडून लावण्यात आलेल्या लव औरंगाबाद तसेच सुपर संभाजीनगरचा चांगलाच समाचार नागरिक घेत असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
काही महिन्यांपूर्वी मनपाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहरात लव औरंगाबाद या फलकाचे अनावरण पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले होते. तेंव्हा नामांतर हा मुद्दा फारसा ऐरणीवर आला नहुता. परंतु टीव्ही सेंटर भागात सुपर संभाजीनगर हे फलक लावताच एमआयएम तसेच काँग्रेसने या विषयाला चांगलाच विरोध केला. तर भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडत शहराचे नामांतर संभाजीनगर करण्यासाठी हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्यावरून चांगलाच राजकीय कलगीतुरा चांगलाच पाहायला मिळत आहे. त्यातच सीएमओ ऑफिस कडून संभाजीनगरचा उल्लेख झाल्याने बाळासाहेब थोरात यांनी जणू महाविकास आघाडीला नामांतरावरून इशाराच दिला आहे त्या वर शहरातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहे.
नागरिक आणि कार्यकर्ते काय म्हणतात ?
काँग्रेस सुरवातीपासून नामांतर करण्याच्या विरोधात आहे. शहराचे नाव हे ऐतिहासिक आहे, त्याला इतिहास आहे. सीएमओ कडून अश्या गोष्टी परस्पर करणे चूक आहे. या आधी देखील अनेक वर्षांपासून हा मुद्दा आहे पण याचा वापर फक्त निवडणुकीतच होतो. त्यामुळे हा कोणाला अस्मितेचा मुद्दा नसून राजकीय हेतू आहे.
-
पवन डोंगरे, काँग्रेस पदाधिकारी

संभाजीनगर व्हायलाच हवे, करण ही भूमी संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या अगोदरच हा मुद्दा अस्मितेचा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या हातात सत्ता आहे, त्यांनी शहराचे नामांतर तात्काळ करायला हवे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नामांतराचे अस्त्र नेहमीच काढत अली आहे. त्याला आता फक्त फलकांची जोड लागली आहे.
-
वर्षा साळुंके, भाजप महिला मोर्चा पदाधिकारी
नामांतर मुद्दा हा शहराला नवीन नाही. त्याला आता फक्त फलकाचे कारण झाले आहे. मनपाने फलकावर जितका खर्च केला तो शहरातील मूलभूत गरजांवर करण्याची गरज आहे. आजही अनेक भागात पाणी नाही, जुन्या शहरात तर चाळीस वर्षां पेक्षा जास्त जुन्या ड्रेनेज लाईन आहे. आज ही जुने शहर विकासापासून वंचित आहे. तिथल्या विकास कामासाठी खर्च करावा.
-
अजय परदेशी, व्यापारी