MaharashtraNewsUpdate : राज्य शासनाच्या निर्णयावरून संभाजी महाराजांनी व्यक्त केला संताप

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना राज्य सरकारने एसईबीसी अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून मराठा विद्यार्थ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या कोट्यातून मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश घेता येणार असं सरकारनं जाहीर केलं आहे. यावरून भाजपचे खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषदेत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे आता जर मराठा आरक्षणात काही धोका झाला तर त्याला राज्य सरकारच जबाबदार असेल, असं सांगत संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाबाबत शंका उपस्थित केली आहे.
राज्य सरकाने काल घेतलेल्या निर्णयाबाबत संभाजी राजे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, २५ जानेवारीला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर सुनावणी होणार आहे. मात्र, त्याधीच सरकार हतबल असल्यासारखं, हरल्यासारखं वागत आहे कि काय अशी शंका येत आहे . मराठा आरक्षण सुपर न्युमररी पद्धतीनं ठरलेलं असताना हे अचानक SEWSआलं कुठून? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वकिलांसोबत व्हीसी झाली तेव्हा त्यांनी सांगितलं होत, ज्यांना हवं ते न्यायालयात जाऊन सवलत मिळवतील. SEWS चा धोरणात्मक निर्णय सरकारनं घेऊ नये, असं असताना हा निर्णय कसा घेतला. आता जर काही धोका झाला तर त्याला जबाबदार सरकार असेल, असंही खासदार संभाजी राजे यांनी राज्य सरकारला बजावलं.
सारथीच्या कारभारावर व्यक्त केली नाराजी
दरम्यान शरद पवार यांच्याबद्दल बोलताना संभाजी महाराज म्हणाले कि , शरद पवार हे शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक आहेत. त्यामुळे त्यांनी सारथीच्या मुद्द्यात हस्तक्षेप करायला हवा. अद्याप या संस्थेला कोणतीही स्वायत्तता मिळालेली नाही. केवळ शाहू महाराजांच्या नावासाठी ही संस्था सुरू ठेवायची असेल तर सरकारनं ती बंद का करत नाही, असा सवाल खासदार संभाजीराजे यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले कि , पुण्यातील ‘सारथी’ ही संस्था शाहू महाराजांचं जीवनस्मारक आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, वर्ष होऊन गेलं तरी सारथीची अवस्था जशी होती तशीच आहे. सरकारमध्ये नेमकं काय सुरू आहे, हे कळायलाच मार्ग नाही. शाहू महाराजांच्या नावानं चालवणारी संस्था ‘सारथी’ नीट चालू द्यायची नसेल तर बंद करून टाका, असंही उद्विग्न मनानं संभाजी राजे यांनी सांगून टाकलं.