MarathawadaNewsUpdate : उत्सुकता निकालाची : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 दि.01 डिसेंबर 2020 रोजी विभागातील आठही जिल्ह्यांत पार पडली. सदरील मतदानाची मतमोजणी प्रक्रिया 03 डिसेंबर 2020 रोजी करण्यात येणार आहे. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या मराठवाडा रिएल्टर्स प्रा. लि. या इमारतीमध्ये मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली आहे. येथे तयार करण्यात आलेल्या दोन हॉलमध्ये प्रत्येकी २८ अशा एकूण ५६ टेबलांवर मतमोजणीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मतपत्रिका एकत्र करणे, गठ्ठे तयार करणे, टेबलावर पाठवणे या प्रक्रियेनंतर पहिल्या पसंती क्रमांकाची मतमोजणी दुपारी चारनंतर सुरू होण्याची शक्यता आहे.
सदर मतमोजणी प्रक्रियेच्या विविध कामकाजासाठी मतमोजणी अधिकारी-कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम.मुगळीकर हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेसी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान पोस्टल बॅलेट मतमोजणी टेबल क्रमांक-1 साठी अतिरिक्त जिल्हाधिकारी जालना अंकुश पिनाटे, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर टेबल क्रमांक-2 साठी अप्पर जिल्हाधिकारी औरंगाबाद अनंत गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोजणी पर्यवेक्षक म्हणून 56 अधिकाऱ्यांची तर राखीव मोजणी पर्यवेक्षक म्हणून 24 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोजणी सहायक म्हणून 168 तर राखीव मोजणी सहायक म्हणून 22 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांना सहाय्य करण्यासाठी 11 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबरोबरच कोविड संदर्भात आवश्यक ती काळजी घेण्यात आली असून यासाठी आरोग्य सेवा सुविधा कक्ष, प्रसार माध्यमांना माहिती देण्यासाठी माध्यम कक्ष, सुरक्षेसंदर्भात बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा, आपत्कालिन परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहे.
वाहतुकीत बदल; चोख बंदोबस्त
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी एमआयडीसी चिकलठाणा येथील मराठवाडा रिएल्डर्स प्रा. लि. येथे होणार असल्यामुळे मतमोजणी होईपर्यंत मंगळवारी रात्री बारावाजेपासून प्रोझोन मॉलकडून लहुजी साळवे चौकाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात येत आहे. या मार्गाकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी एमआयडीसीतील अंतर्गत रस्ते, एन-१ अथवा जळगाव रोडचा वापर करावा. तर पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल तसेच अत्यावश्यक वाहनांना या मार्गावरुन जाण्यासाठी बंदी असणार नाही, अशी माहिती सोमवारी वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी दिली आहे. तसेच चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.