Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात २५४४ नव्या रुग्णांची नोंद

Spread the love

राज्यात गेल्या २४ तासात  ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या सात महिन्यांतील हा सर्वात कमी आकडा ठरला आहे. आजपर्यंत राज्यात करोना संसर्ग झाल्याने ४५ हजार ९७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आरोग्य यंत्रणांसाठी ही खूप दिलासादायक बाब आहे. तर, सध्या राज्यात ८४ हजार ९१८ अॅक्टिव्ह रुग्ण राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. राज्यात करोनामृत्यूंच्या आकड्यात आज पुन्हा एकदा विक्रमी घट पाहायला मिळाली आहे. राज्याचा करोना मृत्यूदर लक्षात घेता हा खूप मोठा दिलासा असल्याचे दिसत आहे. राज्यात सध्या कोरोनाचा २.६३% इतका मृत्यूदर आहे.

राज्यातील आजची करोना स्थिती दर्शवणारी आकडेवारी आरोग्य विभागाने प्रसिद्धीस दिली आहे. त्यानुसार गेल्या २४ तासांत २,५४४ नवीन रुग्णांची भर पडली आहे त्यामुळं राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या १७ लाख ४७ हजार २४२ इतकी झाली आहे. तर, आज ३ हजार ०६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख १५ हजार ३७९ करोना बाधित रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९२. ४५ टक्के इतका झाला आहे.

दरम्यान मुंबईत करोना संसर्गाचा प्रादूर्भाव झपाट्याने खाली येत असून, रुग्ण दुप्पट वाढ कालावधी २५० दिवसांवर पोहोचला आहे. मुंबई पालिकेच्या नोंदीनुसार या रुग्णवाढीचा सरासरी दरही कमी होत चालला असून आता ०. २७ टक्के पर्यंत खाली आला आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग अद्यापही सुरूच असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडतच आहे. आज दिवसभरात राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे आढळून आले. सद्यस्थितीस राज्यात ८४ हजार ९१८ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९१ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. तर ८१ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८९ हजार ६०० वर पोहचली असून यापैकी, ८६ हजार ५२९ जण कोरोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५९९ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

स्वदेशी लशींपासून आधुनिक निदान केंद्रांपर्यंत सर्व माध्यमातून भारताने कोविड १९ साथीला एकात्मिक प्रतिसाद दिला असून त्यातूनच या महासाथीवर काही प्रमाणात मात करणे शक्य झाले, असे मत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केले. दरम्यान, रुग्णसंख्या कमी झाली तरी करोना संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बाधित रुग्णांच्या प्रमाणानुसार जिल्ह्य़ातील रुग्णालयांचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने जिल्ह्य़ांना दिल्या आहेत. तसेच करोना आणि बिगरकरोना उपचारांचा मेळ साधण्यासाठी आधुनिक सुविधांसह उपचार विशेष (सुपर स्पेशालिटी) रुग्णालये करोना रुग्णालये म्हणून ठेवण्याची आवश्यकता नाही, असे आदेशही सर्व जिल्ह्य़ांना दिले आहेत. यामुळे अन्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!