नगरच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा करण ससाणे यांच्यावर

अहमदनगरच्या ज्या जागेवरुन काँग्रेसमध्ये वाद सुरु आहे, तिथला जिल्हाध्यक्षच काँग्रेसने बदलला आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक राहिलेले दिवंगत जयंत ससाणे यांचे पुत्र करण ससाणे यांची नगर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
करण ससाणे हे माजी आमदार आणि शिर्डी देवस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे यांचे पुत्र. साधारणपणे दोन वर्षांपूर्वी जयंत ससाणेंचं कर्करोगाने निधन झालं होतं. करण ससाणे सध्या श्रीरामपूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. ससाणे माळी समाजाचे आहेत.
जयंत ससाणे यांचा श्रीरामपूर आणि विखे-पाटील यांचा राहता हे विधानसभा मतदारसंघ शेजारी आहेत. ससाणे यांचा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर जयंत ससाणे विधानसभा लढले नव्हते. कॉंग्रेसमधे असले तरी विखे-पाटील यांचे ससाणे परंपरागत विरोधक. त्यामुळे करण ससाणेंची नियुक्ती करुन काँग्रेस हायकमांडने विखेंना एकप्रकारे इशारा दिला आहे.