CoronaMaharshtraUpdate : राज्याचा रिकव्हरी रेट ८५ टक्क्यांच्या वर , दिवसभरात आढळले १० हजार २२६ नवे रुग्ण

गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार २२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १३ हजार ७१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान राज्याचा रिकव्हरी रेट वाढून ८५ टक्क्यांच्या वर पोहचला आहे असून हा खूप मोठा दिलासा ठरला आहे. तर राज्यात आज कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ३३७ इतकी झाली आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज १३ हजार ७१४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले असून आतापर्यंत एकूण १३ लाख ३० हजार ४८३ करोना बाधित रुग्णांनी या आजारावर विजय मिळवला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.०४ % एवढे झाले आहे. आज राज्यात १० हजार २२६ नवीन रुग्णांचे निदान झाले तर राज्यात आज ३३७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७९ लाख १४ हजार ६५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५ लाख ६४ हजार ६१५ (१९.७७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
याशिवाय राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा (अॅक्टिव्ह रुग्ण ) आकडा आधीच दोन लाखांच्या खाली आला आहे. सध्या राज्यात १ लाख ९२ हजार ४५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत करोना संसर्गाने राज्यात ४१ हजार १९६ जणांचा बळी घेतला आहे. आज सर्वाधिक ५४ मृत्यूंची नोंद पुणे महापालिका हद्दीत झाली आहे तर मुंबईत ४६ मृत्यू नोंदवले गेले आहेत. सातारा जिल्ह्यात २८ तर सांगली जिल्ह्यात आणखी २४ जण करोनाने दगावले आहेत. आज नोंदवण्यात आलेल्या ३३७ मृत्यूंपैकी १५३ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत तर ४६ मृत्यू हे मागील आठवड्यातील व उर्वरित १३८ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण झपाट्याने खाली येत आहे. सध्या पुणे जिल्ह्यात ४० हजार ३६४ करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर ठाणे जिल्हा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठाण्यात सध्या ३० हजार २२९ अॅक्टिव्ह रुग्ण असून ही रुग्णसंख्या काही प्रमाणात खाली येताना दिसत आहे. मुंबई पालिका हद्दीतील करोना संसर्गाचा विचार केल्यास नवीन रुग्णांचे प्रमाण अजूनही मोठे असले तरी तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा पुणे व ठाणे जिल्ह्यापेक्षा येथे कमीच आहे. मुंबईत सध्या २२ हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.