चर्चेतली बातमी : कारण – राजकारण : महाराष्ट्रातील मंदिरं सुरु न करणारे सरकार प्रतिगामी ? कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेच्या भक्तीवर का घेतली जातेय शंका ?

अति झालं आणि हसू आलं अशी सध्या राज्याची स्थिती आहे. खरे तर महाराष्ट्रात कधी कुठल्या विषयावरून विरोधक रान उठवतील सांगता येत नाही. सध्या राज्यात बाकी काही सुरु होवो कि न होवो , रोजगाराच्या संधी उपलब्ध होवोत कि न व्होवोत सरकारच्या विरोधात राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी मात्र विरोधकांकडून तुणतुणे , डफ आणि टाळ -मृदूंग वाजवायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे मंदिरांशी संबंधित पुजारी, भक्त फारसे आक्रमक नाहीत परंतु राजकीय नेतेमंडळी मात्र अधिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. खरे तर मंदिरांच्या आडून आम्ही कसे मंदिरांच्या बाजूचे आहोत हे दाखविण्याची जणू स्पर्धाच सुरु झाली आहे. खरे तर हि मंदिरं बहुजंनच्या शोषणाची ठिकाणे आहेत. हे अनेक महापुषांनी सांगितले आहे पण ज्यांचे मंदिरात हित आहे त्यांनी मंदिरातील भक्तीला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. असो सध्या हा विषय नाही. विषय आहे कोरोनाकाळात मंदिरं न उघडण्याचा. आणि सरकारला याबद्दल वाटणारी भीती रास्त आहे. परंतु राजकारणासाठी महाराष्ट्रातील नेते सरकारच्या मागे लागली आहेत हे उघड आहे. खरे तर हिंदुत्व आणि मंदिर आमचा आत्मा आहे. हे शिवसेनेने सांगण्याची गरज नसतानाही त्यांच्यावर हि वेळ आली आहे. राजकारण किती वाईट आणि विचित्र असतं त्याचा हा नमुना आहे.
या पार्श्वभूमीवर कोरोना काळात केंद्र शासनाने लॉकडाऊन उठवूनही राज्यातील मंदिरं न उघडणारे राज्यसरकार प्रतिगामी असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे . त्यांनी म्हटले आहे कि, महाराष्ट्र शासन पुरोगामीत्व आणि निर्णय क्षमतेसाठी ओळखलं जातं, पण ते हळूहळू प्रतिगामी होताना दिसतंय. केंद्राने लॉकडाउन उठवण्यासाठी दिलेल्या दिशानिर्देश महाराष्ट्र शासन मान्य करायला तयार नाही. ज्याप्रकारे इतर राज्यांनी मंदिरं आणि आर्थिक केंद्र चालू करून अर्थव्यवस्थेला गती दिली, परंतु महाराष्ट्र शासन त्या दृष्टीने काहीही पावलं उचलत नाही. उलट बेभरवशावरच ठेवलेलं आहे असं एकंदरीत दिसत आहे.” असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र शासन पुरोगामीत्व आणि निर्णय क्षमतेसाठी ओळखलं जातं, पण ते हळूहळू प्रतिगामी होताना दिसतंय. केंद्राने लॉकडाउन उठवण्यासाठी दिलेल्या गाईडलाईन्स महाराष्ट्र शासन मान्य करायला तयार नाही. ज्याप्रकारे इतर राज्यांनी मंदिरं आणि आर्थिक केंद्र चालू करून अर्थव्यवस्थेला गती दिली, pic.twitter.com/vFYsK8kaHi
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) October 15, 2020
दरम्यानच्या काळात प्रकाश आंबेडकर यांनी वारकऱ्यांबरोबर राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी प्रतीकात्मक आंदोलन केलं होतं त्यावेळी त्यांनी म्हटले होते कि , मुख्यमंत्र्यांशी आपले बोलणे झाले असून लवकरच ते मंदिरं उघडतील पण तसे काही झाले नाही. कोरोनाच्या काळात ज्या ज्या राज्यात मंदिरं उघडणं उघडण्यात आली त्यामुळे कोरोना संसर्ग वाढला हे लक्षात घेता , तातडीने मंदिरं उघडणं राज्याला परवडणारे नाही या मतावर मुख्यमंत्री ठाम आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या नंतर भाजपने एका बाजूला आंदोलन सुरु केले तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या हिंदुत्वाचा दाखल देत थेट राज्यपालांनी त्यांना विशेष पत्र लिहून राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले . त्याला मुख्यमंत्र्यांनी जोरदार उत्तर दिले तर शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी अधिक खुलासेवार आपली भूमिका मांडली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तर राज्यपालांच्या पत्रावर आक्षेप नोंदवत थेट पंतप्रधानांना पत्र लिहून राज्यपालांवरील आपली नाराजी कळवली.
सरकार अतिरेक करतंय…
दरम्यान हि राजकीय भट्टी गरम असतानाच प्रकाश आंबेडकर यांनीही आपला हातोडा मारला आहे. आपल्या एका ट्वटिद्वारे त्यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. ज्यामध्ये त्यांनी एक व्हिडिओ देखील जोडला आहे. या व्हिडिओतत्यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्र शासन हे पुरोगामी शासन, आता ते हळूहळू प्रतिगामी व्हायला लागलं आहे. करोना लॉकडाउन उठवतांना केंद्राने अनेक दिशानिर्देश दिले, परंतु महाराष्ट्र शासन त्यांना मान्य करायलाच तयार नाही. आरोग्य सेतूचे अॅप आले, त्यातून लोकांची तब्येत कशी आहे हे कळते. कोरोनाबाधित आहे की नाही हे कळते. परंतु महाराष्ट्र शासनाने अजुनही लॉकडाउन उठवला नाही, अशी परिस्थिती आहे. कदाचित या व्हिडिओनंतर उठवतील अशी परिस्थिती आहे.” तसेच, “इतर राज्यांमध्ये सुद्धा मी फिरतो आहे. इतर राज्यांनी मंदिरं उघडली. तिथला व्यवसाय व भक्तांसह दोघांचीही सांगड घातली. परंतु अजुनही महाराष्ट्र शासन मंदिरं उघडायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूस इतर राज्यांनी आर्थिक घडामोडी सुरू केल्या आहेत. परंतु महाराष्ट्र शासन त्या दृष्टीने काहीही पावलं उचलत नाही. उलट बेभरवशावरच ठेवलेलं आहे असं एकंदरीत दिसत आहे. महाराष्ट्र शासनाने पुरोगामीत्व व निर्णय घेणारं राज्य असं पुन्हा उभं करावं, ही विनंती.” असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. या अगोदर “मराठा आंदोलनकर्त्यांना सरकारनं विश्वास दिला नाही. महाविकास आघाडीचं सरकार अतिरेक करत आहे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या दिशानिर्देशाची अंमलबजावणी करत नाही. वारकरी संप्रदायाने सरकारच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे महाराष्ट्रमध्ये मंदिरे उघडी केली जात नाही. सरकार वारकऱ्यांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहे असं दिसतं आहे,” असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला होता.