MaharashtraNewsUpdate : बॉलीवूडला संपविण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपध्दती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल,” अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एका बैठकीत दिली. कोरोनामुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असून, याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मल्टिप्लेक्स, सिनेमागृहांच्या मालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याबाबत आश्वासन दिले. दरम्यान बॉलीवूडला गेल्या काही दिवसांपासून ठराविक वर्गाकडून बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले कि, मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलीवूडमध्ये बनत आहेत. या बॉलीवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेसृष्टी हे एक मोठा मनोरंजन उद्योग क्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात, असे नमूद करत मुख्यमंत्री ठाकरे यांनी बॉलीवूडच्या बदनामी षडयंत्र रचणाऱ्यांना फैलावर घेतले. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हा प्रकार सहन केला जाऊ शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी बजावून सांगितले.
“आपल्याला जगभरात काही देशांमध्ये करोनाचा संसर्ग वाढल्याने युरोप, ऑस्ट्रेलिया, स्वीडन यासारख्या ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करावा लागला. हिवाळ्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असा इशारा देण्यात आल्याने आपल्याला काळजीपूर्वक पुढे जायचे आहे. महाराष्ट्रात आपण अनलॉक टप्प्याटप्प्याने करण्यामागे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये हाच उद्देश आहे. सिनेमागृहांमध्ये वातानुकुलित वातावरण आहे. प्रेक्षक सिनेमा पहायला आल्यानंतर किमान दोन तास बंदिस्त ठिकाणी असतो. त्यावेळी त्याला संसर्ग होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमधील स्वच्छता पाळली जाणे, सिनेमागृहे वेळोवेळी सॅनिटाईज करण्यात येणे, सिनेमागृहात एकूण आसनक्षमतेच्या फक्त ५० टक्के प्रेक्षक असणे, या बाबी पाळल्या जाणं गरजेचं आहे. एसओपीचं पालन, स्वच्छता, सुरक्षितता, प्रेक्षकांनी मास्क लावणं, सॅनिटाईज करणं आणि शारीरिक अंतर पाळणं हे गरजेचं आहे,” असं मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.