WorldNewsUpdate : ऐन निवडणुकीच्या तोंडावर डोनाल्ड ट्रम्प यांना हे काय झाले ?

ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही बाधा झाली आहे. एक महिन्यानंतर राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. अशा वेळेस ट्रम्प यांचे क्वारंटाईन होणे हे निवडणूक प्रचारापासून ते प्रेसिडेन्शिअल डिबेट (अध्यक्षीय वादविवाद) या सर्वांवर परिणाम करणारे असल्याचे सांगितले जात आहे.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत अध्यक्षीय वादविवादाचे एक महत्त्व आहे. यामध्ये रिपब्लिक आणि डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार आमनेसामने असतात. यामध्ये देशातील विविध मु्द्यांवर चर्चा करण्यात येते. तीन वेळेस अध्यक्षीय वादविवाद होतात. यंदाच्या निवडणुकीतील पहिले अध्यक्षीय वादविवाद हे २९ सप्टेंबर रोजी पार पडले होते. तर उर्वरीत वादविवाद १५ आणि २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षीय वादविवाद ऑनलाइन होतील अशी चर्चा होती. मात्र, क्लीवलँड येथे प्रत्यक्ष लाइव्ह वादविवाद पार पडला.
दरम्यान निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर बायडन आणि ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली. ट्रम्प यांचे वय ७३ वर्ष असून बायडन हे ७७ वर्षांचे आहेत. त्यामुळे प्रचारासाठी दौरा करणे, प्रचार सभांना संबोधित करत असल्यामुळे त्यांना करोनाची बाधा होण्याची भीती व्यक्त केली जात होती. बायडन यांनी करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावधानता बाळगण्यावर भर दिला. दौऱ्या दरम्यान त्यांनी मास्कचा वापर केला तर ट्रम्प मास्क घालत नसल्यामुळे त्यांच्यावर टीका सुरू होती. ट्रम्प यांनी मास्क घालण्याच्या आग्रहावर टीका केली होती. आता ट्रम्प यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे प्रचारावर संशय निर्माण झाला आहे. ट्रम्प आपले दैनंदिन काम करू शकतात असे डॉक्टरांनी सांगितले आहे. तरीदेखील त्यांच्यावर काही प्रमाणात बंधने येणार आहेत. त्यामुळे करोनातून बरे झाल्यानंतर ट्रम्प कसा प्रचार आणि कितपत प्रचार करतील हे पाहावे लागणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने मास्कचा वापर करण्यास नकार दिला होता. इतकंच नव्हे तर करोना महासाथीच्या आजाराची तीव्रता माहित असतानाही त्यांना परिस्थिती हाताळता आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. बायडन मास्कचा वापर करत असल्यामुळे ट्रम्प यांनी त्यांची थट्टा उडवली होती. ट्रम्प हे करोनाबाबतच्या उपाययोजना आखण्यात उदासीन असल्याची टीका करण्यात येत होती.