MarathaReservationUpdate : EWS संवर्गात मराठा समाजाला आरक्षण नकोय , असे का म्हणाले खा . संभाजी महाराज ? त्यावर मुख्यमंत्र्यांनी दिला “हा ” शब्द…

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने दिले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकेल कि नाही यावरून उलट सुलट चर्चा सुरु झाल्यानंतर गोंधळलेल्या स्थितीत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणात मराठ्यांचा समावेश करण्याबाबतचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत होता. मात्र असे केल्यास न्यायालयात असणाऱ्या आरक्षणाला धक्का बसू शकतो, अशी भूमिका घेत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा समाजातील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी आर्थिक निकषावर आरक्षण नको, ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याची माहिती खा. संभाजीराजेंनी दिली आहे.
दरम्यान आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण न देता सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावरच आरक्षण हवे, अशी मराठा समाजाची मागणी आहे. या मागणीसह मराठा क्रांती मोर्चाचे काही नेते आणि संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना यामागची तांत्रिक अडचण सांगितली त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आर्थिक दुर्बल घटकामध्ये मराठ्यांना आरक्षण न देण्याच्या सूचना देण्यात येतील, असा शब्द दिला. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणून सिद्ध झालेला असल्याने इतर कोणतेही आरक्षण मराठा समाजाच्या हिताचे होणार नाही. EWS चे आरक्षण राज्याने मराठा समाजाला लागू केल्यास, सर्वोच्च न्यायालयामध्ये जी लढाई सुरू आहे त्यावर परिणाम होईल. परिणामी मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षणापासून मुकावे लागेल अशी भीती मराठा समाजाला वाटत आहे. दरम्यान २०१४ पासून ज्या पदांची भरती झाली होती. ती समांतर आरक्षणामुळे रखडले आहेत. त्या पदांच्या सहित सर्वच पदांच्या पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्रे देण्यात यावे. मागच्या चालू वर्षांत शैक्षणिक प्रवेशांची कोणत्याही स्वरूपात हेळसांड होऊ नये. याची खबरदारी शासनाने घ्यावी. अशी मागणीही मराठा समाजाने केली आहे.