ऐकावे ते नवलच !! पत्नीला सांगितले , कोरोनाने त्रस्त आहे, आत्महत्या करतोय …आणि दुसरीला घेऊन गेला पळून ….शेवटी पोलिसांनी शोधलेच !!

कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी जात आहे. कुटुंबाचं करोनापासून संरक्षण करायचं आहे… अशी पत्नीला थाप मारून तो घरातून निघून गेला आणि गर्लफ्रेंडला घेऊन पसार झाला. दरम्यान पतीशी संपर्क होत नसल्याने चिंताग्रस्त झालेल्या पत्नीने पतीचा संपर्क होत नसल्याची तक्रार पोलिसांत दिली. या तक्रारींनंतर पोलिसांनी जेंव्हा त्याचा शोध घेतला तेंव्हा या पती महाशयाला गर्लफ्रेंडसोबत इंदूरमध्ये पकडलं. नवी मुंबईतील तळोजा येथे हि विचित्र घटना घडली आहे .
या विषयी पोलिसांनी सांगितले कि , तळोजा येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तरुण मला कोरोना झाला आहे . मी कोविड सेंटरला जात आहे . अशी बतावणी करीत तो घरातून पसार झाला होता . त्याचा मोबाईलही बंद होता . दरम्यान दि. २४ जुलै रोजी त्याने आपल्या पत्नीला फोन करून सांगितले कि , मला करोना झाला आहे. मी खूपच त्रस्त आहे. मी आत्महत्या करण्यासाठी जात आहे. पतीचे हे बोलणे ऐकताच पत्नी रडू लागली. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने तिचा फोन बंद केला. त्यानंतर त्या तरुणाने काही दिवस आपला फोन बंदच ठेवला होता. दुसऱ्या दिवशी त्याच्या मेहुण्याला त्याची दुचाकी वाशीमध्ये सापडली. दुचाकीवर त्याचा हेल्मेट आणि ऑफिसची बॅग, पाकीट होतं. कुटुंबीयांनी वाशी पोलिसांत तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्या तरुणाचा शोध सुरू केला. वाशीजवळच्या नाल्यात त्याचा शोध घेतला. कोविड सेंटरमध्येही त्याला शोधलं. परंतु त्याचा शोध लागत नव्हता . दरम्यान पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधायचा प्रयत्न केला तेंव्हा अखेर तो पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याच्या मोबाईलमध्ये आधीचे सीमकार्ड बंद करून नवीन सीमकार्ड टाकलं तेंव्हा सर्व्हिलान्सच्या मदतीने तो इंदूरमध्ये असल्याचे समजले आणि या थापाड्या पतीचा पर्दापाश केला.