MaharashtraCoronaUpdate : गेल्या २४ तासात १२० पोलिसांना कोरोनाची बाधा, एकूण मृत्यूंची संख्या १३९

गेल्या २४ तासांत १२० पोलिसांना करोनाची लागण झाली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राज्यातील पोलिस दलातील कोरोनाबाधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १३ हजार ७१६ इतकी झाली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १३९ इतकी झाली आहे. तर एका पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनमुक्त रुग्णांचे प्रमाण वाढत असले तरी कोरोनाबाधित रुग्णांची वाढत असलेली संख्या चिंताजनक आहे. दरम्यान मुंबईसह राज्यातील पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्याने पोलिस दलासह त्यांच्या कुटुंबीयांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे.
राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांमध्ये १४५६ अधिकारी आणि १२ हजार २६० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात आत्तापर्यंत १३ हजार ७१६ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे तर, दोन हजार ५२८ अॅक्टिव्ह पोलिस असून त्यातील ३३१ अधिकारी आणि २ हजार १९७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. करोनाच्या या लढ्यात ११ हजार ०४९ पोलिस कर्मचाऱ्यांनी मात केली आहे. यामध्ये ९ हजार ९३९ पोलिस कर्मचारी आणि १ हजार ११० अधिकारी करोनामुक्त झाले आहेत.