AurangabadCrimeUpdate : चंदनचोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, ९८ किलो चंदन केले जप्त, दोघांना २० पर्यंत पोलिस कोठडी

सिडको, एन-४ भागातील वृध्दाच्या बंगल्यात शिरकाव करुन चोरांनी १० आॅगस्ट रोजी मध्यरात्री २५ वर्षे जुने चंदनाचे झाड लांबवले होते. पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासात दोन चंदनचोरांच्या मुसक्या आवळल्या. शेख सादीक शेख कचरु (रा. नायगाव) आणि शेख जाकीर राज मोहम्मद पटेल (रा. फुलेनगर, हर्सुल) अशी चंदनचोरांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना २० आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सिडको, एन-४ भागातील महेश अनंत फडके (६२) यांच्या बंगल्यात शिरलेल्या शेख सादीक व शेख जाकीर यांनी रात्री दहा ते मध्यरात्री दोनच्या सुमारास चंदनाचे २५ वर्षे जुने झाड कापून चोरुन नेले होते. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. हे झाड तिघे छोटा हत्ती वाहनातून घेऊन जात असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली. त्यावरुन १७ आॅगस्ट रोजी दोघांना हर्सुल तलाव परीसर व फुले नगर याठिकाणी पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघांनी फडके यांच्या बंगल्यातून चंदनाचे झाड चोरल्याची कबुली दिली. तसेच चंदनाचे झाड वाहतुक करण्यासाठी वापरलेल्या वाहनातून ९८ किलो चंदन जप्त करण्यात आले. हे दोघेही रेकॉर्डवरील चंदनचोर असून, शहर व ग्रामीण परिसरात अनेक चंदन चोरीचे गुन्हे केले असल्याची दाट शक्यता आहे. त्यांचे फरार साथीदार सुध्दा सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी मोबाईल टॉवरच्या बॅटर चोरीचे सुध्दा गुन्हे केल्याची शक्यता आहे. या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक पोलिस आयुक्त रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, जमादार रमेश सांगळे, पोलिस नाईक बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रविण मुळे, दीपक जाधव, कल्याण निकम, जालिंदर मान्टे, विलास डोईफोडे यांनी केली.