AurangabadCrimeUpdate : वाळूजला चोरीच्या संशयावरुन पकडलेल्या तरुणाचा मृत्यू

औरंगाबाद : चोरीच्या संशयावरुन गुरुवार (दि.२३) पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास नागरिकांनी राजु पोपट सिरसाट (२८ रा. समता कॉलनी वाळूज) तरुणास पकडून बेशुद्ध अवस्थेत त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या प्रकरणी वाळूज पोलिसांनी संशयावरुन तिघांना ताब्यात घेतले. बेशुद्ध मिळून आलेल्या राजु सिरसाट यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यास सकाळी ६ वाजता मयत घोषीत करण्यात आले.
या विषयी अधिक माहिती अशी की, वाळूज पोलिस ठाण्यात गुरुवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास अनिल गिरे याने संपर्क साधुन आम्ही रामराईरोडवर एक चोर पकडून ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. ही माहिती मिळताच ठाणे अमंलदाराने गस्तीवरील पोलिस पथकाला या घटनेची माहिती दिली. यानंतर गस्तीवरील पोना. व्ही.एस.खंडागळे, चालक विजय दारुंटे आदीच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रामराई रोडवर एक इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आला.
यावेळी पोलिस पथकाने घटनास्थळी हजर असलेल्या नागरिकांची चौकशी केली असता बेशुद्ध पडलेल्या इसमाचे नाव राजु पोपट सिरसाट (२८ रा.समता कॉलनी, वाळूज) असल्याचे समजले. यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी असलेल्या अनिल गिरे, रमेश गिरे, संदीप गिरे, ऋषिकेश मोहन व नागरिकांच्या मदतीने बेशुद्ध पडलेल्या राजु सिरसाट यास पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास सकाळी ६ वाजता मयत घोषीत केले.
या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ. सुनिल म्हस्के हे करीत आहेत. या विषयी सहायक पोलिस निरीक्षक विनायक शेळके यांच्याशी संपर्क साधला त्यांनी राजु यास काही नागरिकांनी चोर असल्याच्या संशयावरुन पकडले होते. पोलिस घटनास्थळी गेले असता त्यांना राजु हा बेशुद्ध अवस्थेत मिळून आला असून नंतर त्याचा शासकीय रुग्णालयात मृत्यु झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असून नातेवाईकांनी तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.