IndiaChinaDisputeUpdate : चीनला कमकुवत लेखण्याची चूक भारताने न करण्याचा इशारा

Indian front-line troops broke the consensus and crossed the Line of Actual Control, deliberately provoking and attacking Chinese officers and soldiers, thus triggering fierce physical conflicts and causing casualties.
— Hua Chunying 华春莹 (@SpokespersonCHN) June 18, 2020
भारत -चीन यांच्यातील वादावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी आम्हाला भारताने कमकुवत लेखण्याची चूक करू नये अशा शब्दात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी भारताला धमकी दिली आहे. सोमवारी, रात्री भारत-चीनच्या सैनिकांमध्ये हिंसाचार झाला. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती आहे. भारताविरोधात चीन सरकार आपल्या वृत्तपत्रातून चिथावणीखोर वक्तव्य करत असताना आता परराष्ट्र मंत्रालयाने यामध्ये उडी घेतली आहे.
याबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, भारताच्या सैनिकांनी दोन्ही देशांमधील परस्पर सहमतीने घेतलेल्या निर्णयाचे उल्लंघन केले. त्यांनी जाणूनबुजून चीनच्या सैनिकांना चिथावणी देत हल्ला केला. यामध्ये काही सैनिक मारले गेले असल्याचा कांगावा चीनने केला आहे. भारताने सध्याच्या स्थितीमध्ये आम्हाला कमकुवत समजू नये. चीन आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास सज्ज असल्याचेही हुआ यांनी म्हटले.
दरम्यान या आधी बुधवारी, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, ही घटना चीनच्या हद्दीत झाली. त्यामुळे या घटनेस आम्ही जबाबदार नाही. दोन्ही देश डिप्लोमसी आणि लष्करी संपर्कात आहेत. चीन आणि भारत दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवतील असेही त्यांनी म्हटले. मे महिन्याच्या सुरुवातीला चीनच्या फौजांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत प्रवेश केला. त्यानंतर चिनी सैन्याने माघारी जावे यासाठीही भारतीय सैनिकांनी त्यांना सुनावले. या दरम्यान वादावादी झाली होती. या घटनेनंतर दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढतच आहे. २०१६ मध्ये चीनकडून २९६ वेळा घुसखोरी करण्यात आली, २०१७ मध्ये ४७३, तर २०१८ मध्ये ४०४ वेळा घुसखोरीचा प्रयत्न झाला. गलवान खोरे आणि नाकू ला सेक्टरसारख्या भागांमध्ये चीनकडून वारंवार घुसखोरीचे प्रयत्न करत आक्रमकता दाखवली जात आहे.