घोटाळेबाज निरव मोदीला अटक करून भारतात पाठविण्याची सीबीआयची इंटरपोलकडे याचना !!

पंजाब नॅशनल बँकेत १४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला तत्काळ अटक करा अशी मागणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) इंटरपोलआणि ब्रिटनमधील संबंधित संस्थांशी संपर्क साधत केली आहे. मोदी याच्या विरोधात गेल्या वर्षी जुलै महिन्यात रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली आहे.
लंडनमध्ये असलेला नीरव मोदी लंडनमधून कुठेही दुसरीकडे पळून जाऊ नये याची काळजी घ्यावी अशी विनंती सीबीआयने इंटरपोलकडे केली असल्याचे सीबीआयमधील सूत्रांनी माहिती देताना सांगितले. नीरव मोदी लंडनमधून अन्य देशांमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती हाती आली आहे. मोदी लंडनमध्येच आहे ही माहिती इंटरपोलने २०१८मध्येच दिली होती, मात्र तो नेमका कुठे राहतो हे अनिश्चित आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मोदी युरोपीय देशांमध्ये सगळीकडे फिरत असतो अशी माहितीही भारतीय संस्थांना मिळाली आहे. या दरम्यान तो भारत, ब्रिटन आणि अमेरिकेत आपल्या विरोधात सुरू असलेल्या प्रक्रियांबाबत तो वकिलांच्या भेटी घेतो असेही समजले आहे. गेल्या वर्षी मोदीने फ्रान्स, हाँगकाँग, अमेरिका आणि बेल्झियन या देशांमध्ये जाऊन आला आहे.
नीरव मोदी लंडनमध्ये नेमका कुठे आहे, हे समजल्यानंतर आता आमचे पुढचे पाऊल त्याला तत्काळ अटक करण्याचे असले पाहिजे असे नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने सांगितले. त्याने केलेल्या विविध गुन्ह्यांची माहिती ब्रिटन सरकारला प्रत्यर्पणाची मागणी करत असताना दिली गेली असल्याचेही अधिकारी म्हणाला. मोदीचा भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. अशा स्थितीत तो कोणत्या कागदपत्रांच्या आधारे देशाबाहेर प्रवास करतो हे ब्रिटन सरकारने पाहिले पाहिजे असेही अधिकारी म्हणाला.