#AurangabadNewsUpdates : किती पोलिसांनां कोरोना झालाय ? उपायुक्त पदावरील जबाबदार अधिकाऱ्यांची “उत्तर” देण्यात अशीही उदासीनता…

औरंगाबाद शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले कर्तव्य निभावताना आयुक्तालयातील किती पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे ? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी औरंगाबादच्या पोलीस अधिका-यांना वेळ नसून ते खूप कामात असल्याचे उत्तर देऊन आपल्याच पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती प्रेसला देण्याबाबत आपण किती उदासीन आहोत हेच जणू दाखवून दिले. शेवटी बरीच चर्चा झाल्यानंतर उपायुक्त मॅडमला उपरती झाली आणि त्यांनी एका ओळीचा एसएमएस करून आपले कर्तव्य पार पाडले. दरम्यान या प्रकरणात महानायक ऑनलाईनने पाठपुरावा केल्यानंतर नसता वाद वाढायला नको म्हणून सायंकाळी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. कोडे यांनी अधिकृत प्रेस नोट प्रसिद्धीला देण्याचे औदार्य दाखवले. या प्रेस नोटनुसार औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस अधिकाऱ्यासह ९ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे . त्यापैकी एका कर्मचाऱ्याला उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून उर्वरित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
दरम्यान पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकरणात माहिती मागितल्यास माहिती देताना टाळाटाळ केली जाते , बऱ्याचदा प्रेस मीडियाला योग्य माहिती देण्यात जबाबदार अधिकाऱ्यांना स्वारस्य नसते याबाबत पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सुसंसवादाचे धडे देण्याची गरज आहे. खरे तर आयपीएस सारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना सौजन्याने वागण्याविषयी कोणी तरी आठवण करून द्यावी लागते हि सुशासनाची दुर्गतीच म्हणावी लागेल दुसरे काय ? शहरातील किती पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे ? पत्रकार आपल्या सहकाऱ्यांच्या संदर्भात माहिती विचारात आहेत . याचे उत्तर देणे आपले कर्तव्य आहे याचे साधे भानही या अधिकाऱ्यांना असू नये याचे आश्चर्य वाटते. पोलीस अधिकारी , कर्मचारी यांच्यात आणि पोलिसांच्या कुटुंबियांच्या सुसंवादाचा अभाव असल्यामुळे कोरोनाबाधित पोलीस निरीक्षकाच्या मुलाने थेट पोलीस आयुक्तांच्या विरोधात पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
राज्यात बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याने औरंगाबाद शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आरोग्याची अवस्था काय आहे हे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी जगदीश कस्तुरे यांनी याबाबतची अधिकृत माहिती देण्यासाठी घेण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे शाखा तथा जनसंपर्क अधिकारी डॉ . नागनाथ कोडे यांना विचारले असता,पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांना विचारा असे सांगितले. त्यानुसार उपायुक्त मीना मकवाना यांना आमच्या प्रतिनिधीने फोन लावला आता , किती पोलिसांना कोरोनाची बाधा झाली ? या प्रश्नाचे उत्तर न देता, ” आपण स्वतः कामात आहोत , एका पत्रकाराला माहिती दिली आहे , त्यांच्याकडून घ्या , अन्यथा इथे कार्यालयात येऊन माहिती घ्या … “ असे सल्ले दिले आणि शेवटी एसएमएस केला कि १ अधिकारी आणि ५ कर्मचारी. स्वतःच्या खात्यातील किती कर्मचाऱ्याना कोरोनाची बाधा झाली ? हे सांगण्याचे सौजन्यही हे अधिकारी दाखवत नसतील किंवा वरिष्ठ अधिकारीच आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रति इतके असंवेदनशील असतील तर याला काय म्हणायचे ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
या प्रकरणी मुख्यमंत्री सचिवांनी दखल घेत सांगितले की, पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद आणि पोलिसउपायुक्त मीना मकवाना यांच्या विरोधात बर्याच तक्रारी प्राप्त होत आहेत. स्वता: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या प्रकरणात लक्ष घालणार असून या बाबत औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्रकुमार सिंघल यांना चौकशी अहवाल करण्याचे आदेश देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
शेवटी “महानायक ऑनलाईन”ने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी या विषयावरून संपर्क साधला असता , “कामाच्या घाईत होते असे… ” असे उत्तर देऊन माहिती घेऊन कळवतो, असे उत्तर देऊन अखेर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ . कोडे यांनी सायंकाळी सविस्तर प्रेस नोट पाठवली. या प्रेस नोट मध्ये त्यांनी म्हटले आहे कि , औरंगाबाद शहरात संचारबंदी आणि जमाबंदी च्या काळात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना याची लागण झाली आहे. यामध्ये पोलीस नियंत्रण कक्षातील एक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे जिन्सी येथे कार्यरत दोन पोलीस कर्मचारी, पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले एक पुरुष व दोन महिला महिला कर्मचारी, पोलीस ठाणे एम. वाळूज , पोलीस ठाणे वेदांत नगर व वाहतूक शाखा येथे कार्यरत असणारे प्रत्येकी एक कर्मचारी यांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेअंतर्गत धूत हॉस्पिटल, एमजीएम हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय, मनपा आरोग्य विभाग शासकीय रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत .
सदर कोरोना विषाणूची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्याला डिस्चार्ज दिला असून क्वारंटाईन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद उपायुक्त मीना मकवाना यांनी हॉस्पिटलला भेट देऊन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबत हॉस्पिटल व्यवस्थापकांशी वेळोवेळी चर्चा केली असता सदर कर्मचारी अधिकारी यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या औषधी उपचाराकरता स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे . सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी मास्क व वापर करावा, सोशल सोशल डिस्टंन्सीगचे तंतोतंत पालन करावे व बंदोबस्त करावा अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर नागनाथ यांनी कळवले आहे.
पोलीस नियंत्रण कक्ष – एक पोलीस निरीक्षक । पोलीस ठाणे जिन्सी येथे कार्यरत दोन पोलीस कर्मचारी । पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले एक पुरुष व दोन महिला महिला कर्मचारी, ।पोलीस ठाणे एम. वाळूज , पोलीस ठाणे वेदांत नगर व वाहतूक शाखा येथे कार्यरत असणारे प्रत्येकी एक कर्मचारी : एकूण -९
#बाबा गाडे । औरंगाबाद