#CoronaVirusUpdte : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २९ हजार , राज्यातून ६ हजार ५६४ रुग्ण उपचारानंतर पोहोचले घरी

गेल्या २४ तासात कोरोनाचे १ हजार ५७६ नवीन रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णांची संख्या २९ हजार १०० झाली आहे. त्याचवेळी दिवसभरात ५०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात करोना रुग्ण दुपटीचा वेग ११ दिवसांवर आला असून राज्यात शुक्रवारी ४९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील ३४ रुग्ण मुंबईतील आहेत. राज्यातील कोरोनाबळींची एकूण संख्या १ हजार ०६८ इतकी झाली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान सलग तिसऱ्या दिवशीही राज्यात करोनाबाधित रुग्णवाढीचा चढता आलेख कायम आहे.
मुंबई महापालिकेतील एकूण रुग्णांची संख्या १७ हजार ६७१ इतकी झाली असून, मुंबईतील एकूण बळींची संख्या ६५५ इतकी आहे. पुणे महानगरपालिका हद्दीत करोना बाधित एकूण रुग्णांची संख्या ३ हजार १४१ इतकी असून, आजतागायत १७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिकेच्या हद्दीत १ हजार ३०२, नवी मुंबई महापालिका हद्दीत १ हजार १७७, मालेगाव शहरात ६६३, तर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील एकूण रुग्णांची संख्या ४४४ इतकी झाली आहे. आज राज्यात ४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील ३४, पुण्यातील सहा, अकोला शहर, धुळे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये प्रत्येकी दोन तर पनवेल, जळगाव आणि औरंगाबाद शहरात प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष आणि २० महिला आहेत. यापैकी ६० वर्षे व त्यावरील वयोगटातील २२ रुग्ण, ४० ते ५९ वयोगटातील २३ रुग्ण असून, ४० वर्षाखालील चार रुग्ण आहेत. एकूण मृतांपैकी ३२ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्दयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातून ६ हजार ५६४ रुग्ण उपचारानंतर पोहोचले घरी
सध्या राज्यात ३ लाख २९ हजार ३०२ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून, १६ हजार ३०६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजपर्यंत राज्यातून ६ हजार ५६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्या १ हजार ४७३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून, आज एकूण १४ हजार १६७ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून, त्यांनी ५८.९७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे असे टोपे यांनी सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ५० हजार ४३६ नमुन्यांपैकी २ लाख २१ हजार ३३६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर २९ हजार १०० जण पॉझिटिव्ह आले आहेत असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्रात काल गुरुवारी करोनाच्या १,६०२ नवीन रुग्णांची विक्रमी नोंद झाली असून, राज्यात करोनाबाधितांची एकूण संख्या २७ हजार ५२४ इतकी झाली आहे. राज्यात करोनामृतांच्या संख्येने चार अंकी आकडा गाठला असून, आत्तापर्यंत एकूण मृतांची संख्या १,०१९ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील २५ तर नवी मुंबईतील १० जणांचा समावेश आहे. राज्यात सध्या २० हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.